सांस्कृतिक

‘विठूरायाच्या’ गजराने अख्खी दुमदुमली प्रतिपंढरपूर करहरनगरी

ह.भ.प. कळंबे महाराजांनी सुरु केलेल्या या सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे फिटले पारणे.

.करहर :वास्तवनामा वृत्तसेवा

   भेटी लागे जीवा लागलीसे आस हा ध्यास घेऊन लाखो भाविकांनी करहर च्या विठ्ठल मंदिरात हजेरी लावली. ग्यानबा तुकाराम च्या जयघोषात वैष्णवांच्या मेळ्याने करहर नगरी दुमदुमून गेली. जावळी महाबळेश्वर तालुक्याचे अध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांनी सुरु केलेल्या या सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

पहाटेपासूनच आज येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर दर्शन रांग सुरु करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविकांनी या सोहळ्यास हजेरी लावून विठूरायाचे दर्शन घेतले. दुपारी बारा वाजता वैकुंठवासी ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या जन्मभूमीतून दिंडी सोहळा करहर कडे मार्गस्थ झाला. कळंबे महाराजांची कर्मभूमी असलेल्या बेलोशो याठिकाणी दुपारी हा सोहळा काही काळ विसावला. त्यानंतर महू धरणाच्या भिंतीवर या सोहळ्याचे पहिले गोल रिंगण पार पडले.

चार वाजता करहर च्या मुख्य बाजारपेठेत हा दिडी सोहळा दाखल होताच परिसरातील हातगेघर, वालुथ, करंदी भागातील अनेक दिंड्या मुख्य दिंडीत सहभागी होऊन माऊलींच्या सजवलेल्या अश्वाचा उभ्या रिंगणाचा नेत्रदीपक सोहळा संपन्न झाला. यावेळी हजोरो भाविकांनी माऊलींचा एकच जयघोष केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, हभप दत्तात्रय महाराज कळंबे बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे व मान्यवरांनी या सोहळ्याचे स्वागत करून दिडीप्रमुख व वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सर्व राजकीय पक्ष, जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींकडून भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे,जावळी सहकारी बँकेचे चेअरमन व संचालक यांच्यासह प्रांताधिकारी आशिष बारकुल,तहसीलदार प्रविण मुदगूल व मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्यासह पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button