प्रशासकीय

नवीन शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी जिल्ह्यात बदली प्रक्रिया राबवा

प्राथमिक शिक्षक समितीची जिल्हापरिषद प्रशासनाकडे मागणी;

सातारा : वास्तवनामा वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पवित्र पोर्टलद्वारे येणाऱ्या नवीन शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी जिल्ह्यातील विद्यमान शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती जिल्हाअध्यक्ष किरण यादव सरचिटणीस संतोष घोडके यांनी अर्थ शिक्षण समिती सभापती तेजस्विनी कदम यांच्याकडे केली आहे.

समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या शिक्षकांच्या कागदपत्र पडताळणी व समुपदेशनाची प्रक्रिया येत्या काही दिवसांत सातारा जिल्हा परिषदेत राबविण्यात येणार आहे. त्यापूर्वी जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित बदली प्रक्रियेचा टप्पा राबविल्यास अनेक शिक्षकांना त्यांच्या सेवाज्येष्ठता, पात्रता व शासनाच्या निकषांनुसार इच्छित ठिकाणी बदलीची संधी मिळू शकते, अशी भूमिका शिक्षक समितीने मांडली आहे.

जिल्ह्यात शिक्षकांच्या संवर्ग १ ते संवर्ग ४ अंतर्गत बदली प्रक्रिया राबविताना विस्थापित शिक्षक तसेच दुर्गम, अडचणीच्या व गैरसोयीच्या ठिकाणी सेवा बजावत असलेल्या महिला शिक्षिकांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने यावेळी केली.विशेषतः अनेक महिला शिक्षिका दुर्गम व अडचणीच्या ठिकाणी सेवा बजावत असून, त्यांना कौटुंबिक तसेच दैनंदिन अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बदली प्रक्रियेत अशा महिला शिक्षिकांना शासनाच्या नियमानुसार प्राधान्य देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी सभापतींकडे केली.

यावेळी जिल्हाअध्यक्ष किरण यादव,सरचिटणीस संतोष घोडके,जिल्हाउपाध्यक्ष तातोबा भिसे,सुधाकर दुंदळे,कार्याध्यक्ष शिवाजी शिंदे,कोषाध्यक्ष तानाजी वाघमोडे,महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button