प्रशासकीय

शहर वाहतूक शाखेने महाविद्यालय परिसरात राबवली वाहन तपासणी मोहीम

शहरात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

सातारा : वास्तवनामा वृत्तसेवा

 सातारा शहरातील वाय. सी. कॉलेज, शिवाजी कॉलेज, डी. जी. कॉलेज तसेच कल्याण शाळा परिसरात सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान अचानक नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. विनापरवाना वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, मॉडिफाय सायलेन्सरचा वापर करणे तसेच मोटार वाहन कायद्याचे इतर विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर यावेळी मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे नोंदवून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

दरम्यान यावेळी वाहतूक शाखेने राबवलेल्या मोहिमेदरम्यान महाविद्यालय परिसरातील युवकांची चांगलीच भंबेरी उडाली. अनेक युवकांनी तपासणी नाक्यापासून साईड रस्ता मार्गाने वाहने आपली बाहेर काढली. मात्र  तरीदेखील वाहतूक शाखेने यावेळी कॉलेज परिसरात वाहनावर मोटार वाहन कायद्या अंतर्गत ५६ वाहनांवर कारवाई करून ३२,५०० रुपये दंड वसूल केला.

अशा पद्धतीने महाविद्यालय परिसरात नियम भंग करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कारवाई मोहीम अशीच राबवली जाणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.

या मोहीमेत वाहतूक शाखेच्या अर्चना मोहिते,माया महामुलकर,योगेश जाधव,भाग्यश्री जाधव,सुकेश नावडकर यांनी सहभाग नोंदवला.

“महाविद्यालय परिसरात युवकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा,वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येईल.”
राजेश माने
सहाय्यक पोलीस निरीक्षक
शहर वाहतूक शाखा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button