राजकीय

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी!

सायगाव विभागातील युवा नेतृत्वाला संधी देण्याची ज्येष्ठांची मागणी; भाजप संघटन बळकट होण्याची अपेक्षा

मेढा: वास्तवनामा वृत्तसेवा

 पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदाचा मार्ग ग्रामविकास विभागाने मोकळा केला असून, या पदासाठी सायगाव विभागातील युवा कार्यकर्ते आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक, माजी सैनिक इंद्रजित भिलारे यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रतापगड कारखान्याचे माजी संचालक भानुदास गायकवाड विद्यमान संचालक विठ्ठल मोरे,भाजप किसान मोर्चा जावळी अध्यक्ष राहुल माने या ज्येष्ठ मंडळींनी ही मागणी केली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी दरम्यान कुडाळ गटात इंद्रजित भिलारे यांनी पायाला भिंगरी लावून प्रभावीपणे काम केले. गावोगावी संपर्क साधत युवकांना संघटित करण्याबरोबरच पक्षाच्या विचारांशी तरुणांना जोडण्याचे काम त्यांनी केले आहे.
विशेष म्हणजे सायगाव विभागातून सध्या दोन महिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. त्यामुळे या विभागाला प्रतिनिधित्वाची संधी देताना तरुण चेहऱ्याला पुढे आणावे, अशी भूमिका ज्येष्ठ मंडळींकडून व्यक्त होत आहे. इंद्रजित भिलारे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला स्वीकृत सदस्यपदाची संधी मिळाल्यास सायगाव विभागातील युवकांना अधिक प्रभावी नेतृत्व मिळू शकते, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
युवक संघटन उभारण्यात सक्रिय भूमिका इंद्रजित भिलारे यांनी घेऊन सायगावसह कुडाळ आणि भणंग विभागातील युवकांना एकत्र जोडण्याचे काम सातत्याने केले आहे. विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून युवकांशी त्यांचा सातत्याने संपर्क राहिला आहे. त्यामुळे त्यांना स्वीकृत सदस्यपदाची संधी दिल्यास या भागातील युवकांचे संघटन आणखी मजबूत होण्यास मदत होईल, असे समर्थकांचे म्हणणे आहे.
सायगाव विभागाला युवा नेतृत्वाची संधी आणि भाजपला संघटनात्मक बळ देण्यासाठी इंद्रजित भिलारे यांना स्वीकृत सदस्यपद मिळावे, अशी मागणी बाबा साळेकर,ला.बा. पतसंस्था संचालक नितीन मोरे,विष्णू करंजकर आदी ज्येष्ठ मंडळींसह युवकांमधूनही पुढे येत आहे.

माजी सैनिकाचा अनुभव पक्षासाठी ठरणार उपयुक्त

  सैन्य दलात सेवा बजावून निवृत्त झालेले इंद्रजित भिलारे यांच्याकडे शिस्त, संघटन कौशल्य आणि नेतृत्वाचा अनुभव आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी सक्रिय भूमिका बजावत युवकांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी त्यांच्या नावाचा विचार केल्यास भाजपचे संघटन आणखी बळकट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button