राजकीय

शिंदेंच्या होमपीचवरील आखाडे सोसायटीचा ठराव राजे गटाचा

उषा शिंदेंचा झाला ठराव ; जावळीत दिवसभर रंगली आखाडे सोसायटी ठरवाचीच चर्चा

करहर : वास्तवनामा वृत्तसेवा

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यातील विविध विकास सोसायट्यांच्या ठरावांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे होमपीच समजल्या जाणाऱ्या आखाडे गावातील विकास सोसायटीच्या ठरावाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिंदे गटाला आखाडे गावातून मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळेच शिल्पा शिंदे यांच्या विजयात आखाडे गावाची निर्णायक भूमिका राहिली होती.मात्र, सोसायटीच्या ठरावावेळी राजकीय समीकरणांना अनपेक्षित कलाटणी मिळाली. व येथील ठराव अखेर राजेगटाच्या बाजूनेच झाला.

आखाडे हे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे होमपीच मानले जाते. त्यामुळे येथील ठराव हा शिंदे यांच्या बाजूनेच होणार अशी राजकीय चर्चा गेले काही दिवसांपासून रंगत होती. दोन्ही बाजूंनी संचालकांना सहलीवर देखील पाठवण्यात आले होते.आज गुरुवारी बँक ठरावासाठी सोसायटी संचालकांची बैठक बोलावण्यात आली होती. त्या दृष्टीने दोन्ही बाजूंचे सहलीवर गेलेले संचालक बैठकीस हजर राहिले.

या बैठकीला दस्तुरखुद्द बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, जावळी पंचायत समिती सभापती सौरभ शिंदे, बाजार समिती सभापती जयदीप शिंदे सागर धनावडे  देखील आखाडे गावात दाखल झाले होते. तर माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या बाजूने त्यांचे सुपुत्र तेजस शिंदे,माजी सभापती मोहनराव शिंदे, बाजार समिती संचालक बुवासाहेब पिसाळ यांच्यासह समर्थक आखाडे गावात दाखल झाले होते. दोन्ही बाजूंनी राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

दोन्ही गटांनी आपल्या संचालकांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठी रणनीती आखली होती.अशा परिस्थितीत संचालकांच्या झालेल्या बैठकीत राजेगटाच्या महिला संचालिका उषा सुरेशराव शिंदे यांना सहा मते, शिंदे गटाचे उमेदवार व सोसायटी चेअरमन राजेंद्र शिंदे यांना पाच मते मिळाली व हा ठराव राजे गटाच्या बाजूने झाला.

यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक फौजदार गंगावणे यांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button