सामाजिक

नेवेकरवाडी ग्रामस्थांच्या मदतीला प्रतापगड प्रशासन आले धावून

नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत शुद्ध पाणीपुरवठा सुरू

कुडाळ : वास्तवनामा वृत्तसेवा

 नेवेकरवाडी या.जावली येथील नागरिकांना शुद्ध व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी प्रतापगड सहकारी साखर कारखाना प्रशासनाने पाणीप्रश्नाची तातडीने दखल घेत संबंधित पाण्याच्या स्रोताची पाहणी केली .कारखाना प्रशासनाकडून पाण्याचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पाणी दूषित होण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक उपाययोजनाही हाती घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, समस्या पूर्णपणे सुटेपर्यंत नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी टँकर द्वारे शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती प्रतापगड कारखान्याचे संचालक बाळासाहेब निकम यांनी दिली.

नेवेकरवाडी गावास पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी दूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने विलंब न करता संबंधित पाण्याच्या स्रोताची पाहणी करण्यात आली. पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्याची कार्यवाही सुरू असून, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पाणी दूषित होण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण आणि सुरक्षितता यांना प्रशासनाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. कारखान्यातील प्रक्रिया तसेच सांडपाणी व्यवस्थापन शासनाच्या पर्यावरणीय नियमांचे पालन करूनच करण्यात येते. या पाणीप्रश्नावर केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे निकम यांनी स्पष्ट केले.

पाण्याची समस्या पूर्णपणे मार्गी लागेपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये, यासाठी कारखाना प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये आणि प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे

जावली तालुक्याचे माजी आमदार सहकारमहर्षी लालसिंगराव काका तसेच मा. राजेंद्र शिंदे भैय्यासाहेब यांच्या पुढाकारातून सोनगाव, करंदोशी व नेवेकरवाडीच्या माळावर प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली. प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत कारखान्याने विविध अडचणींवर मात केली आहे.सध्या ना. छत्रपती श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन सौरभबाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुडगुंटी प्रतापगड शुगर्स ॲण्ड बायोएनर्जीस प्रा. लि. यांच्या सहकार्याने कारखान्याचे कामकाज सुरू आहे.

कारखाना हा केवळ ऊस उत्पादक व सभासदांचा आर्थिक आधार नसून, परिसरातील कामगार आणि नागरिकांशीही त्याचे जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचेल, अशी कोणतीही बाब दुर्लक्षित केली जाणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

पाणी दूषित होण्याचे नेमके कारण निश्चित करून त्यावर योग्य व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभाग आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू आहे. ऊस उत्पादक सभासदांचे हित, कामगारांचे हित तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य व पर्यावरण यांना कारखाना प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. प्रशासनाने तातडीने शुद्ध पाणीपुरवठा सुरू केला असून, पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, तसेच संबंधित विहिरीतील दूषित पाणी सुद्धा मोटार ने उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे असे संचालक बाळासाहेब निकम यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button