मुलाच्या वाढदिवसापेक्षाही राजेंनी दिलेली जबाबदारी महत्त्वाची ; सागर धनावडे यांची निष्ठा चर्चेत
३२ मतदार सहलीवर; तेरा वर्षीय मुलाच्या वाढदिवशी व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता लक्षात घेऊन राजकीय पक्षांकडून मतदारांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळीतील ३२ मतदारांना सहलीवर पाठवले असून, या सर्व मतदारांची जबाबदारी जिल्हा बँकेचे संचालक रांजणे यांचे विश्वासू युवा शिलेदार सागर धनावडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, ही जबाबदारी सांभाळताना धनावडे यांच्यासमोर भावनिक प्रसंगही आला. त्यांचा तेरा वर्षीय मुलगा स्वरूप याचा वाढदिवस असतानाही कुटुंबापासून मैलोनमैल दूर राहून त्यांनी नेत्यांनी सोपविलेली जबाबदारी प्राधान्याने पार पाडली. मुलाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता आले नसले तरी व्हिडीओ कॉलद्वारे त्यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि लाडक्या मुलाला दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
जावळीच्या राजकारणात सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. भाजपने संघर्षातून जवळपास ४८ पैकी ३८ ठराव आपल्या बाजूने खेचून आणल्याने निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी कोणतीही गफलत होऊ नये, यासाठी आधीपासूनच सावधगिरी बाळगत मतदारांना सहलीवर पाठविण्यात आले आहे.या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी सागर धनावडे यांच्यावर सोपविण्यात आली. नेत्यांनी दिलेला आदेश आणि जबाबदारी हीच आपली प्राथमिकता मानत त्यांनी वैयक्तिक कौटुंबिक प्रसंग बाजूला ठेवून मतदारांची व्यवस्था आणि त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी निष्ठेने सांभाळली.
राजकारणात नेत्यांच्या अवतीभोवती केवळ स्वार्थासाठी वावर करणारे अनेक कार्यकर्ते दिसतात. जावळीत असे कार्यकर्ते खूप पहायला मिळतात मात्र, पक्ष आणि नेत्यांनी सोपविलेली जबाबदारी स्वतःच्या कौटुंबिक आनंदापेक्षाही महत्त्वाची मानून ती प्रामाणिकपणे पार पाडणारे कार्यकर्ते तुलनेने विरळच. सागर धनावडे यांच्या या कृतीमुळे जावळीच्या राजकीय वर्तुळात ‘निष्ठावंत शिलेदार’ म्हणून त्यांची चर्चा सुरू झाली आहे.
एका बाजूला मुलाचा वाढदिवस आणि दुसऱ्या बाजूला नेत्यांनी सोपविलेली अत्यंत महत्त्वाची निवडणुकीची जबाबदारी अशा दुहेरी प्रसंगात धनावडे यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. कुटुंबापासून दूर असतानाही व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मुलाच्या आनंदात सहभागी होत त्यांनी भावनिक नातेसंबंधही जपला आणि राजकीय जबाबदारीही तितक्याच ताकदीने सांभाळली.त्यांच्या या निष्ठेची आणि त्यागाची चर्चा सध्या जावळीत होत असून, नेत्यांच्या आदेशाला शिरसावंद्य मानून जबाबदारी पार पाडणाऱ्या अशा कार्यकर्त्यांमुळेच संघटना मजबूत होते, अशी भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
मी मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा एक निष्ठावंत मावळा आहे.माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे,ती मी निष्ठेने आतापर्यंत पार पाडत आलो आहे.त्यामुळे २४ ऑगस्टला मुलगा स्वरूप याचा वाढदिवस असतानाही “आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे”ही उक्ती डोळ्यासमोर ठेवून मी अज्ञातस्थळी जिथं आहे तिथूनच मुलाला शुभेच्छा दिल्या व त्याच्या या सुखद क्षणात सहभागी झालो.
सागर धनावडे युवा नेते जावळी



