संततधार पावसाचा तडाखा : सायघरमध्ये घरावर दरड कोसळली
जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे ऑन द स्पॉट घटनस्थळी अधिकाऱ्यां समवेत दाखल

मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा
जावळी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मौजे सायघर येथे आज भीषण प्रकार घडला. गावातील श्री शंकर दगडू धनावडे यांच्या घरावर दरड कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हालचाली करत धनावडे कुटुंबाचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले.घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी तत्काळ सायघर गाठून परिस्थितीची पाहणी केली.
गेली दोन दिवसांपासून जावळी तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून आज बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सायकर येते धनावडे यांच्या घरावर ही दरड कोसळली व त्यांचे घरगुती साहित्याचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने जीवित हानी कोणतीही झाली नसल्याचे प्रशासनाने सांगितले..
दरम्यान घटबेची माहिती मिळताच म्हसवे गटाचे जिल्हा परिषद सदस्य मानकुमरे यांनी तहसीलदार प्रवीण मुद्गुल, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील तसेच ग्रामसेवक मंगेश शिंदे यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली.व या कुटूंबियासह सायघर ग्रामस्थांना योग्य ते सहकार्य केले तसेच परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी संबधीत कुटूंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मानकुमरे यांनी प्रशासनाला दिले. तसेच भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.



