आंदोलनाच्या माध्यमातून पत्रकारांची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या आंदोलकावर कडक कारवाईची मागणी
इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मिडिया प्रतिनिधींचे अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांना संबंधितावर गुन्हा दाखल करण्याबाबत संयुक्त निवेदन

सातारा :वास्तवनामा वृत्तसेवा
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलनास बसलेल्या संदीप जाधव नामक व्यक्तीकडून स्थानिक पत्रकार व नामांकित प्रसारमाध्यमांविरुद्ध जाणीवपूर्वक खोटे, बिनबुडाचे व दिशाभूल करणारे गंभीर आरोप केले जात आहेत. या कृत्यामुळे संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राची नाहक बदनामी होत असून, संबंधित आंदोलकावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी सातारा जिल्ह्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघटनांच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आंदोलक संदीप जाधव हा आटाळी येथील गट क्रमांक ३४७ मधील कथित २३२ ब्रास उत्खनन प्रकरणाचा वारंवार उल्लेख करत आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या प्रकरणाचा सक्षम महसूल प्राधिकरणाद्वारे कायद्यातील नियमांनुसार यापूर्वीच योग्य तो निपटारा केलेला आहे. असे स्पष्ट असतानाही, केवळ जुन्या पंचनाम्याचा चुकीचा आधार घेऊन बदनामीच्या दुष्ट हेतूने जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवली जात आहे. यामुळे पत्रकारांची तुषार तपासे आणि ओंकार कदम यांची सामाजिक व व्यावसायिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान ‘झी मीडिया’, ‘सकाळ समूह’ तसेच त्यांच्या संपादकांची नावे विनाकारण घेऊन निराधार आरोप केले जात आहेत. या प्रकरणाशी कोणताही थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नसताना केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी व दबाव आणण्यासाठी माध्यम संस्थांची सार्वजनिकरीत्या बदनामी केली जात असल्यामुळे संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींनी केली आहे.
पत्रकार संघटनांच्या प्रमुख मागण्या:
सखोल चौकशी: आंदोलकाद्वारे करण्यात आलेल्या वक्तव्यांची व भाषणांची तातडीने चौकशी करण्यात यावी.
फौजदारी कारवाई: BNS, २०२३ च्या लागू असणाऱ्या कलमांनुसार संदीप जाधववर तात्काळ गुन्हा दाखल करावा.
प्रतिबंधात्मक उपाय: भविष्यात कोणत्याही पत्रकार किंवा माध्यम संस्थेची पुराव्याशिवाय बदनामी होऊ नये म्हणून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.



