केळघर येथील रामजीबुवापूलावरील वाहतुक पूर्ववत
बांधकाम विभागाकडून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी

केळघर :वास्तवनामा वृत्तसेवा
दोन दिवसांपासून जावळीत संततधार पाऊस असल्याने केळघर येथील वेण्णा नदीवर बांधण्यात आलेला रामजीबुवा पुलाच भराव काही प्रमाणात खचला होता. मात्र बांधकाम विभागाकडून तात्काळ या ठिकाणी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली असून, या पुलावरील वाहतूक सोमवारी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

दोन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने या अतिपर्जन्यवृष्टीमुळे रामजीबुवा पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव काही प्रमाणात खचला होता.मात्र पुलाला कोणताही धोका निर्माण झालेला नव्हता. हा पूल नव्यानेच बांधण्यात आला असून या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूंना नव्यानेच भराव करण्यात आला होता. पूल बांधण्यात आल्यानंतर हा पहिलाच पाऊस असल्याने काही प्रमाणात रविवारी येथील भराव खचला होता.मात्र सोमवारी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी पाहणी करून अंमलबजावणी केली व पुलाच्या दोन्ही बाजूंना मजबूत भराव टाकत वाहतूक पूर्ववत सुरू केली.
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल आहिरे, उपअभियंता दिनेश पवार, शाखा अभियंता कोहाळे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करीत या पुलावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी केली.
“रामजीबुवा पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून त्यानंतर पहिलाच पाऊस पडत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना भराव टाकण्यात आला होता.पहिल्या पावसात हा भराव काही प्रमाणात खचला होता. मात्र आज या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूंना मजबूत भराव टाकण्यात आला असून येथील वाहतूक पूर्वत सुरू करण्यात आली आहे.तसेच पुलाला कोणताही धोका निर्माण झालेला नाहीये.
राहुल आहिरे कार्यकारी अभियंता सातारा



