कुसूंबी प्राथमिक आरोग्य केंद्राला ५० खुर्च्यांची भेट; रुग्णांना दिलासा
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून मदत; चंद्रकांत वेंदे यांच्या पाठपुराव्याला यश

मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा
जावळी तालुक्यातील कुसुबी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी ,ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांना बसण्यासाठी तसेच आरोग्यकर्मचाऱ्यांसाठी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सुमारे ५० खुर्च्यांची उपलब्धता करून देण्यात आली. या खुर्च्यांमुळे ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रतीक्षेदरम्यान बसण्याची सुविधा मिळणार असून रुग्णांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
कुसुबी प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज परिसरातील अनेक गावांमधून नागरिक उपचारासाठी येत असतात. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी पुरेशा आसनव्यवस्थेचा अभाव जाणवत होता. ही बाब लक्षात घेऊन गावातील युवा नेते चंद्रकांत वेंदे यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत आरोग्य केंद्रासाठी सुमारे ५० खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या.
या उपक्रमामुळे आरोग्य केंद्रातील रुग्णांना अधिक सुसज्ज सुविधा मिळणार असून नागरिकांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच चंद्रकांत वेंदे यांचे आभार व्यक्त केले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
अध्यक्ष साधू चिकणे यांच्या हस्ते या खुर्च्यांचे वितरण आरोग्य केंद्राला करण्यात आले.यावेळी डॉ.अंकुर जगदाळे, डॉ. इंद्रजित दबडे, आरोग्य निरीक्षक सतीश मर्ढेकर, चंद्रकांत सुतार, अनिल दळवी, आरोग्य सहायिका सुवर्णा जाधव, सार्थिका घार्गे, आरोग्य सेवक विराज नरुळे, सोनाली संकपाळ, धनश्री शिंदे, सोनल जवळ, रुपाली शेलार आदी उपस्थित होते.



