प्रशासकीय

पंचायतराज अभियानात कावडीची कामगिरी वाखाणण्याजोगी

विभागीय समिती अध्यक्ष विजय मुळीक यांचे गौरवोद्गार

करहर : वास्तवनामा वृत्तसेवा

 धरणग्रस्त गाव असूनही विकासाच्या वाटेवर भक्कम पाऊल टाकत मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियानात कावडी ग्रामपंचायतीने केलेली उल्लेखनीय कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. जावळीसारख्या दुर्गम भागातील ही ग्रामपंचायत राज्यस्तरावर निश्चितच आपला ठसा उमटवेल, असा विश्वास अहिल्यानगरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विभागीय मूल्यमापन समितीचे अध्यक्ष विजय मुळीक यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या जावळी तालुक्यातील कावडी ग्रामपंचायतीची विभागस्तरीय मूल्यमापन समितीने बुधवारी सखोल पाहणी केली. समितीच्या आगमनावेळी गावाच्या प्रवेशद्वारावर ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक पद्धतीने व महिलांच्या उत्स्फूर्त सहभागातून समितीचे जंगी स्वागत करण्यात आले.
यानंतर समितीने ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक स्वच्छता व्यवस्था, वृक्षारोपण मोहिम, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता उपक्रम, जलसंवर्धनाची कामे तसेच ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली.

विशेष म्हणजे, राज्यातील ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या उपहारगृहाच्या संकल्पनेचे समिती सदस्यांनी विशेष कौतुक केले. ग्रामपंचायतीने स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच गावाच्या उत्पन्नात वाढ होईल, अशा दृष्टीने राबविलेला हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी असल्याचे समिती सदस्यांनी नमूद केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे म्हणाले, “कावडी गावाच्या विकासात महिलांचा सक्रिय सहभाग, ग्रामस्थांची एकजूट आणि लोकसहभाग हीच खरी ताकद आहे. सर्वांनी एकदिलाने काम केल्यामुळेच आज कावडीने विभागीय स्तरापर्यंत मजल मारली असून राज्यातही गावाचे नाव उज्ज्वल होईल, असा विश्वास आहे.”

मूल्यमापनादरम्यान समितीने ग्रामपंचायतीचे प्रशासन, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, पाणी व्यवस्थापन, सामाजिक सहभाग, महिला बचतगटांचे योगदान, लोकसहभागातून उभारलेली विकासकामे तसेच ग्रामस्थांच्या सहभागाचे विशेष कौतुक केले.

यावेळी समिती सदस्य रामप्रसाद लाहोटी (अप्पर आयुक्त, विकास, विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक), राजन पाटील (प्रकल्प संचालक, पुणे), दादासाहेब गुंजाळ (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर), पी. एस. म्हस्के (कृषी विभागीय अधिकारी, जळगाव), रवींद्र महाजन (कार्यकारी अभियंता, नाशिक), राहुल देसाई (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा), माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, उपसभापती गोरख महाडिक, गटविकास अधिकारी निलेश पाटील, श्रीहरी गोळे, संदीप परामणे, रवी परामणे, सरपंच यशवंत मानकुमरे, सुरेश गायकवाड, पोलीस पाटील प्रमोद मानकुमरे, राजेंद्र गोळे, अजय राऊत, ग्रामविकास अधिकारी मंगेश शिंदे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निसर्गसंपन्न कावडीने समितीला घातली भुरळ

डोंगररांगांच्या कुशीत वसलेले आणि हातगेघर धरणाच्या सान्निध्यातील निसर्गरम्य कावडी गाव पाहून विभागीय मूल्यमापन समिती भारावून गेली. उशाला हिरव्यागार डोंगररांगा आणि पायथ्याशी जलसंपन्न धरण अशी रम्य नैसर्गिक पार्श्वभूमी लाभलेल्या कावडीने पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, जलव्यवस्थापन आणि ग्रामविकासाचा सुंदर मेळ घालत आदर्श निर्माण केला आहे.
गावातील प्रत्येक विकासकामात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, महिलांचे नेतृत्व, लोकसहभागातून राबविलेले उपक्रम आणि जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने केलेली नियोजनबद्ध वाटचाल याबद्दल समितीने विशेष समाधान व्यक्त केले. गावाची एकजूट, विकासाची दृष्टी आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी हीच कावडीच्या यशामागील खरी ताकद असल्याचे मत समिती सदस्यांनी नोंदविले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button