जावळी तालुक्यात पावसाची संततधार सुरूच…
केळघर विभागात पडझड; जीवितहानी टळली, रेंडीमुरा शाळेच्या पत्र्यांचे नुकसान

मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा
जावळी तालुक्यात गेल्या चोवीस तासांपासून पावसाची संततधार सुरू असून जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवत आहे. विशेषतः केळघर विभागात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
केळघर परिसरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळणे, किरकोळ पडझड तसेच रस्त्यांवर माती वाहून येण्याच्या घटना घडल्या.नव्याने बांधण्यात आलेल्या रामजीबुवा पुलाचा भराव खचला मात्र आज बांधकाम विभागाने तो भरून घेत वाहतूक पूर्ववत सुरू केली.
दरम्यान, रेंडीमुरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवरील पत्रे जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उडाल्याने शाळेचे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शाळेच्या इमारतीची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी पंचायत समिती सदस्या शिल्पा शिंदे यांनी केली आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदी-नाले, ओढे व धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे तसेच आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंडलनिहाय पावसाची नोंद (मिमी)
बामणोली – 195.3 मिमी
केळघर – 181.3 मिमी
अनेवाडी – 97.5 मिमी
कुडाळ – 70.5 मिमी
बामणोली व केळघर मंडलात सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याने या भागातील नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज असून महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.तसेच अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मंगळवार ७ जुलैला देखील तालुक्यातील शाळा बंदच राहणार आहेत.
प्रवीण मुदगुल,तहसिलदार जावळी



