प्रशासकीय

उंटावरून शेळ्या हाकू नका; समन्वयाने कामे करा 

ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या

सातारा :वास्तवनामा वृत्तसेवा

 
 जावली तालुक्यात पाचवड- मेढा- मुनावळे- शेंबडी या रस्त्यासह विविध रस्त्यांची कामे सुरु आहेत. काही ठिकाणी वन विभागाची जागा असल्याने कामे मार्गी लागण्यास अडचणी येत आहेत. संबंधित विभाग एकमेकांवर टोलवाटोलवी करून केवळ लांबड लावत आहेत. मी आमदार, मंत्री आहे मीच सगळं करायचं का? तुमची कामे तुम्ही करायला नको का? उंटावरून शेळ्या हाकायच बंद करा, अशा कानपिचक्या देत सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे मार्गी लावा अशा सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.
येथील शासकीय विश्रामगृह येथे ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार आणि अध्यक्षतेखाली पाचवड- मेढा- मुनावळे- शेंबडी या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास प्राधिकरणाच्या रस्त्याचे काम सुरु असून यामध्ये येणाऱ्या अडचणीवर तोडगा काढण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. बैठकीला प्रांताधिकारी आशिष बारकूल, वन विभागाचे अधिकारी अमोल सातपुते, कोयना वन्यजीव विभागाचे उप संचालक किरण जगताप, सहायक वनसंरक्षक हाके, एमएसआयडीसीचे मुख्य अभियंता र. रा. हांडे, कार्यकारी अभियंता संतोष बम्पलवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, उप अभियंता आर. आर. अंबेकर, मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, जावलीचे तहसीलदार प्रवीण मुदगुल, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 ज्या ठिकाणी वन विभागाची जागा आहे त्या ठिकाणी काम करण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने वन विभागाकडे पाठवा. आज पाठवतो, आजचे उद्या उद्याचे १० दिवसांनी असले उद्योग आता थांबवा. स्थानिक पातळीवरील अडचणी तुम्हीच सोडवल्या पाहिजेत, हे तुमचे काम आहे. वन विभागाने देखील आडमुठी भूमिका न घेता रस्ते कामासाठी लागणाऱ्या परवानग्या तातडीने द्याव्यात. प्रत्येक गोष्टीत अडवणे योग्य नाही, ही जनहिताची कामे आहेत, याची जाणीव ठेवा, असे ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. कास पठार येथे रस्त्याचे रुंदीकरण नव्हे तर जेवढा आहे तेवढाच रस्ता केला जाणार आहे, त्यालाही फॉरेस्ट वाले आडकाठी आणत आहेत, मग रस्त्यांची कामे कशी मार्गी लागतील, असेही ते म्हणाले.
 मुनावळे- अंबवडे कळकोशी रस्त्यालाही परवानगी द्या. मेढा येथे काही अतिक्रमणामुळे कामात अडथळा येत असल्याच्या तक्रारी आहेत. पोलीस प्रशासनाने बंदोबस्त लावून संबंधित विभागाने अतिक्रमण हटवावे. कोणीही काहीही करेल म्हणून काय कामे थांबवायची का? असा सवाल करून ना. शिवेंद्रसिंहराजेंनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून रस्त्यांची कामे मार्गी लावावी, अशी सक्त सूचना यावेळी केली. दरम्यान, हुमगांव ते बावधन रस्ता मार्गी लावण्यासाठी कोलेवाडी-  सोमर्डी येथे ६०० मीटर बोगदा करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. तसेच करहर येथील विठ्ठल मंदिर परिसरात भाविक- भक्तांसाठी विविध सोयी सुविधा विकसित करण्याचाही आढावा ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव मानकुमरे, भाजप मंडल अध्यक्ष संदीप परामने आदी उपस्थित होते.
  मी गावात थांबून शाळा बांधून घेतली….
कारगाव, कात्रेवाडी ही गावे बफर झोन मध्ये येत आहेत. येथील लोकांची घरे फॉरेस्टच्या जागेवर आहेत. येथे लोक राहतात, याची जाणीव फॉरेस्टने ठेवावी. एकतर त्यांना त्याच ठिकाणी रस्ते व सर्व सोयीसुविधा उपलन्ध होण्यासाठी फॉरेस्टने परवानगी द्यावी, किंवा त्यांना पर्यायी जागा पुनर्वसनासाठी द्यावी, अशी सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. दरम्यान, येथील शाळा फॉरेस्टच्या एका अधिकाऱ्याने पाडली होती, येथे मी थांबून शाळा बांधून घेतली होती. या आठवणीला उजाळा देत ना. शिवेंद्रसिंहराजेंनी वन विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.       

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button