जिल्हा बँक निवडणुकीसाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उतरले मैदानात
जावळीतील सोसायटी संचालकांची रिसॉर्टवर गुप्त बैठक संपन्न

मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यातील विकास सोसायट्यांच्या संचालकांची महत्त्वपूर्ण गुप्त बैठक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत एका रिसॉर्टवर पार पडली. या बैठकीमुळे जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग आला असून जावळीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
बैठकीस तालुक्यातील ४९ विकास सोसायट्यांपैकी तब्बल ४४ सोसायट्यांचे संचालक उपस्थित होते अशी खात्रीशीर माहिती असून,जिल्हा बँक निवडणुकीच्या रणांगणात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपली प्रभावी ताकद दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वतः सक्रिय झाल्याचे या बैठकीतून स्पष्ट होत असून, कोणत्याही परिस्थितीत आपलाच समर्थक याठिकाणी निवडणुकीत ते उतरवणार असे दिसत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासमोरील आव्हान अधिक कठीण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या बैठकीनंतर माजी आमदार शशिकांत शिंदे निवडणुकीबाबत कोणती रणनीती आखतात आणि कोणती भूमिका घेतात, याकडे आता जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांचा पराभव झाल्याने त्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल असे अनेकांना वाटत होते मात्र विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, जावळी मतदारसंघातून विद्यमान संचालक ज्ञानदेव रांजणे यांनाच मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पुन्हा उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात असून, याबाबत लवकरच अधिकृत चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
या बैठकीस माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे,जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे,सभापती सौरभ शिंदे,बाजार समिती सभापती जयदीप शिंदे,उपसभापती गोरख महाडिक,भाजप मंडलअध्यक्ष संदीप परामणे,युवा नेते सागर धनावडे,यांच्यासह सोसायटी चेअरमन,संचालक उपस्थित होते.



