जावळीत अजूनही दूर आहेत त्यांनी निर्णय घ्यावा :मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे आवाहन
माजी आमदार सदाशिव सपकाळ यांचा नवी मुंबई येथे भाजप प्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई: वास्तवनामा वृत्तसेवा
नवी मुंबई येथील शेतकरी समाज भवन येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमांमध्ये राजकारण बाजूला ठेवून जावळी तालुक्यात अजून सुद्धा जे दूर आहेत त्यांनी निर्णय घ्यावा असे जाहीर आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. या वक्तव्यामुळे जावळीतील राजकीय घडी पुन्हा व्यवस्थित बसवून विकासाच्या दृष्टीने दमदार पावले टाकली असल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
जावळीचे माजी आमदार सदाशिव सकपाळ यांच्या भाजप प्रवेशा निमित्त झालेल्या कार्यक्रमाला माजी खासदार संजीव नाईक, वसंतराव मानकुमरे , ज्ञानदेव रांजणे,सुरेश गायकवाड, संदीप परामणे, अँड .शिवाजीराव मर्ढेकर, जयदीप शिंदे,युवा नेते सागर धनावडे, कविता धनावडे, अरुणा शिर्के, मच्छिंद्र मुळीक, दत्ता गावडे, दत्ता भालेघरे, ज्ञानेश्वर दळवी,चंद्रकांत वेंदे, विजय शेलार,विजय सावले, अविनाश कारंजकर, समाधान पोफळे, आनंदराव सपकाळ, गणेश जगताप, रवि परामणे, राम शेलार, मोहन कासुर्डे,के के शेलार, मुरलीधर शिंदे, संदीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले.
प्रारंभी जावळी तालुक्यात विविध गावातून आलेल्या सरपंच व नेत्यांच्या उपस्थितीत माजी आमदार सदाशिव सकपाळ यांचा नागरिक सत्कार करण्यात आला.
बोंडारवाडी धरण हेच एकमेव ध्येय
जावळीचा आमदार असताना महू-हातगेघर धरणास सुरुवात केली. तर आता जावळीच्या पश्चिम भागाला व केळघर भागाला वरदान ठरणारे बोंडारवाडी धरण व्हावे.भाजपच्या माध्यमातून व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने हे धरण मार्गी लावणे हेच आता एकमेव ध्येय राहील असे मत प्रवेश कार्यक्रमात माजी आ. सदाशिव सपकाळ यांनी मांडत जावळीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण यापुढे भाजप सोबत राहणार असल्याचे ग्वाही देखील त्यांनी यावेळी मांडली.
वसंतराव मानकुमरे यांची अंकुश कदमांवर जहरी टीका
जावळीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये विचार व्यक्त करताना या मेळाव्याला चांगलीच जान आणली. जावळीतून लुडबुड करणाऱ्या शिवसेनेच्या नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश कदमांचा त्यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला.जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत जावळीत अंकुश कदमाने उतरावेच त्याचा “खुटाच” उपटून टाकतो असा मानकुमरे यांनी समाचार घेतला.



