देशाच्या संसाधन नियोजनात जनगणनेचे अनन्यसाधारण महत्त्व :- जिल्हाधिकारी संतोष पाटील
मेढयातील जनगणना प्रशिक्षणास जिल्हाधिकाऱ्यांची भेट

मेढा :वास्तवनामा वृत्तसेवा
देशाच्या संसाधनांच्या नियोजनामध्ये व विकास प्रक्रियेमध्ये जनगणनेचे अनन्यसाधारण महत्त्व असून हे महत्त्वाचे राष्ट्रीय काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल त्यांनी उपस्थितांचे अभिनंदन केले. जनगणनेच्या कामकाज प्रामाणिकपणे व सचोटीने करण्याचे आवाहन तसेच येणाऱ्या काळात प्रगणक घरोघरी आल्यानंतर सर्व नागरिकांनी देखील अचूक माहिती सांगावी असे आवाहन देखील जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
जावली तालुक्यात एकूण २४६ घर यादी गट तयार करण्यात आले असून एकूण २३७ प्रगणकांची, ४५ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याच सोबत ४ फील्ड ट्रेनर्स ही नियुक्ती करण्यात आले आहेत. जनगणनेची सर्व प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण मेढा येथील फार्मसी कॉलेज येथे सुरू असून या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज भेट दिली.यावेळी ते बोलत होते.
जगातील सर्वात प्रतिष्ठित, सर्वात मोठ्या प्रशासकीय आणि सांख्यिकीय उपक्रम जनगणना २०२७ असून. भारतामध्ये जनगणना १८७२ पासून सुरू करण्यात आली. येणारी जनगणना ही देशातील १६ वी जनगणना असून राष्ट्राच्या नियोजन आणि विकासासाठी आवश्यक असलेली माहिती या जनगणनेद्वारे संकलित केली जाणार आहे. ही जनगणना दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना होणार आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्षात लोकसंख्या गणना होणार आहे. येणाऱ्या १६ मे २०२६ पासून १४ जून २०२६ पर्यंत तीस दिवसात पहिल्या टप्प्यातील घरगणनेची प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार आहे.
सदर प्रक्रियेसाठी प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णतः डिजिटल असून मोबाईल अॅप द्वारे माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच सर्व नागरिकांना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वगणना ही करता येईल.
मेढा येथे सुरू असलेल्या या प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब यांनी भेट दिली. सदर क्षेत्रभेटीमध्ये जिल्हाधिकारी यांनी प्रशिक्षण सत्रात बसून सत्राची गुणवता पाहणी केली. तदनंतर सर्व प्रगणक व पर्यवेक्षक यांच्याशी संवाद साधला. सदर माहिती ही पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार असून त्याचा उपयोग विकास योजना व धोरणे ठरवताना शासनाला होणार आहे. या सर्व प्रक्रियेकडे कर्मचारी तसेच नागरिक यांनी राष्ट्रीय कर्तव्य समजून निःसंशयपने अचूक माहिती नमूद करण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल,तहसीलदार तथा चार्ज अधिकारी प्रवीण मुदगुल,निवासी नायब तहसीलदार सुनील मुनाळे,महसूल नायब तहसीलदार निसार शेख,मुख्याधिकारी मेढा अजिंक्य पाटील, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सौरभ ठुबे,भरत पवार तसेच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व तज्ञ प्रशिक्षक, प्रगणक, पर्यवेक्षक उपस्थित होते.



