अपघात

बिभवीत अचानक चार घरांना आग ….

आगीत घरांचे मोठे नुकसान....

मेढा :वास्तवनामा वृत्तसेवा

 सोमवार सकाळी बिभवी तालुका जावळी येथील साडे नऊच्या सुमारास चार घरांना अचानक लागलेल्या आगीत घरांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने यावेळी घरातील लोक शेतातील कामानिमित्त बाहेर गेल्याने जिवितहानी अथवा कोणी जखमी झाले नाही. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बिभवी तालुका जावळी येथील मुख्य चौकात ग्रामपंचायतचे कार्यालय, हनुमान मंदिर आणि भैरोबा मंदिराजवळ असलेल्या विठ्ठल शंकर कदम,पांडुरंग शंकर कदम,

वसंत शंकर कदम, दत्तात्रय सावळा कदम, प्रभाकर सावळा कदम यांच्या राहत्या घरांना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक आग लागली. आग कशाने लागली हे मात्र कळू शकले नाही. ही घरे जुन्या पद्धतीचे व लाकडाची असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. अशातच प्रत्येक घरात सिलेंडर असल्याने हा धोका मोठ्या प्रमाणात वाढला होता. आजूबाजूला लागून असलेली घरे त्यामुळे हा आग आटोक्यात आणणे अवघड जात होते. त्यातच घरातील दोन गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन छपरावरील जळकी लाकडे इस्तःता विखुरली गेली. सातारा पोलिस तुषार दादू शिंदे यांनी धाडस दाखवून भयानक आग असताना तीन गॅस टाक्या बाहेर काढल्या. त्याच्या मुळे मोठा अनर्थ टळला, राहिलेल्या दोन टाक्यांचा आगीत मोठा स्फोट झाला. आग विझवण्यासाठी ग्रामस्थानी अथक प्रयत्न केले.
तरीही राहत्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. सरपंच संतोष बांदल , उपसरपंच कांताराम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग वाघ, प्रवीण देशमुख, विक्रम जाधव, ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह ग्रामस्थ अथक परिश्रम करत होते.
मेढा येथील विलास पवार यांनी स्वतःच्या टँकर आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग मोठ्या प्रमाणात असल्याने ते प्रयत्न विफल ठरले त्यानंतर सातारा नगरपरिषदेचा अग्निशमन बंब आल्यानंतर साधारणतः बाराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या ठिकाणी मेढा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच ग्राम महसूल अधिकारी श्री. नगरवाल यांनी ही घटनेचा पंचनामा केला असून ऐन थंडीच्या दिवसांत चार कुटुंबावर ह्या आगीमुळे उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.

  हाकेच्या अंतरावर मेढा नगरपंचायत मात्र नगरपंचायतीकडे अग्निशामक बंब नाही

मेढा नगरपंचायत येथून हाकेच्या अंतरावर असली तरी या ठिकाणी मोठ्या क्षमतेचा अग्निशमन बंब उपलब्ध नाही. त्यामुळे तालुक्यात कोठेही आगीची घटना घडल्यास सातारा किंवा वाई या ठिकाणावरून बंब बोलवावा लागतो, यात खूप वेळ जाऊन आगीची तीव्रता वाढून नुकसान मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे स्थानिक पातळीवर अग्निशमन बंब उपलब्ध होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button