राजकीय

निमसोड गटात युवा नेते श्रीकांत देवकरांचा पुकार,,,

निमसोड गटात भाजपकडून प्रबळ दावेदार

निमसोड : वास्तवनामा वृत्तसेवा (अजित जगताप)

 सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण खटाव तालुका सध्या राजकीय पटलावर चांगलाच गाजत आहे. सर्वपक्षीय नेत्याची भूमी असं खटावचे वर्णन होते. त्याच खटाव मधील निमसोड जिल्हा परिषद गटामध्ये सध्या युवा नेतृत्व श्रीकांत देवकर यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी होऊ लागलेली आहे. समाजकारणातून उभारण्यात आलेले हे नेतृत्व भविष्यात निमसोड जिल्हा परिषद गटातील इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या गटातून सर्व समावेशक विकास कामे सर्वानूमते करतील. असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

खटाव तालुक्यातील मतदार हे जागरूक व स्वाभिमानी बाणा जपणारे आहेत. दुष्काळी परिस्थितीवर मात करून आपलं नेतृत्व गुण उद्योग व्यवसायात सिद्ध केले आहे. ज्यांना उद्योग व्यवसायामध्ये अनुभव नाही. त्यांनी शैक्षणिक क्रांती करून प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने वैचारिक प्रगल्भता व सर्वधर्मसमभाव जागृत ठेवणारी भूमी म्हणून निमसोड भागात पाहिले जाते.

या भागाने काँग्रेस व इतर पक्षाची विचारधारा जतन केली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही सक्रिय सहभाग घेतला. राजकीय परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता असल्यामुळे ज्या ठिकाणी पक्ष प्रवेश करतील. त्या ठिकाणी पक्ष वाढीसाठी ही प्रामाणिक प्रयत्न करणारे नेतृत्व या भागात तयार झालेले आहे.
युवा नेते श्रीकांत देवकर यांनी यापूर्वी संघटनात्मकरित्या बांधणी करताना खटाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरीत पक्षीय कार्यालय उभे करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत. वडार समाजातील युवा नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असली तरी ग्राम विकास मंत्री गोरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व समावेशक व व्यापक दृष्टिकोन ठेवून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेतली जाऊ लागलेली आहे. काही व्यक्ती ही पदापेक्षा मोठी असते. त्यांच्या निवडीने पदालाही प्रतिष्ठा प्राप्त होते .
सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये खटाव तालुक्यातून सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष , विविध विषय सभापती व इतर महत्त्वपूर्ण पदे मिळवले आहेत. अगदी महाराष्ट्राच्या विधान परिषदेवरही खटावकरांनी झेंडा फडकवला आहे.

सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत वडार समाजाला कधीच संधी मिळाली नाही. ही संधी चालून आलेली आहे. निमसोड जिल्हा परिषद गटातून युवा नेते श्रीकांत देवकर यांच्यासाठी सर्व जाती धर्मातील पक्ष विरहित व पक्षीय कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. इतर मागासवर्गीय गटातील वंचित म्हणून वडार समाजाकडे आता संधी देण्याच्या प्रयत्न जाणीवपूर्वक केला जाणार आहे. त्याच कार्याच्या जोरावर भविष्यात पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

युवा नेते श्रीकांत देवकर यांनी निमसोड भागांमध्येच नव्हे तर संपूर्ण खटाव तालुक्यामध्ये अनेक मातब्बर मंडळींच्या नेतृत्वाखाली काम केलेले आहे. सध्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकारण व समाजकारणातून चांगली पायाभरणी केलेली आहे.
गेल्या पंधरा-वीस वर्षाच्या त्यांच्या वाटचालीमध्ये धनगर समाजाचे नेते व आमदार गोपीचंद पडळकर, युवा नेते अंकुश गोरे, शेखर गोरे यांचे नेतृत्व मानले आहे.भविष्यात दमदार वाटचाल करण्याचा त्यांचा मानस आहे.

मी कुणाचाही स्पर्धक नसून प्रत्येकाचा मी सेवक आहे. समाजाची सेवा करण्याचे ब्रीदवाक्य सत्तेच्या माध्यमातून पूर्ण होते. याची त्यांना खात्री पटली आहे. त्यामुळे सत्ता ही प्रतिष्ठा- संपत्ती- मान- सन्मान मिळवण्याचे साधन नसून गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर, शेतकरी, वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. यावर त्यांचा ठाम विश्वास असल्याने त्यांना खेड्यापाड्यातून प्रतिसाद लाभत आहे. हे त्यांच्या यशाचे गमक ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button