जावळीतील म्हाते गावात दिवाळीत पेटला श्रमदानाचा दीप

मेढा :वास्तवनामा वृत्तसेवा
दिवाळीचा आनंदोत्सव सुरू असतानाही जावळी तालुक्यातील म्हाते खुर्द येथील ग्रामस्थांनी स्वच्छतेचा आणि श्रमदानाचा संकल्प कायम ठेवत समाजाला प्रेरणा दिली आहे. आज गावातील नागरिकांनी एकत्र येऊन उत्साहाने श्रमदान कार्यक्रम राबविला. सणाच्या काळातसुद्धा ग्रामविकासासाठी दिलेला हा वेळ गावकऱ्यांच्या एकजुटीचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला.
या उपक्रमात महिला, युवक, तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, व मंदिर परिसरात स्वच्छता करून “स्वच्छ गाव – सुंदर गाव” या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ग्रामस्थांनी यावेळी सांगितले की, “मुख्यमंत्री पंचायत राज समृद्धी अभियानात म्हाते खुर्द हे नाव अग्रक्रमाने उजळेल,” असा दृढ विश्वास आणि आशावाद त्यांनी व्यक्त केला.
स्वच्छतेचा दीप आणि श्रमदानाची परंपरा जपणारे म्हाते खुर्द हे गाव आजही समाजासाठी आदर्श ठरत आहे विकास दळवी
पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते



