आंदोलनाविरोधी बोलणारे धरणग्रस्त नव्हे तर दलाल : वसंतराव मानकुमरे
प्रशासन दखल घेणार नाही तोवर आंदोलन सुरु राहणार

कुडाळ :वास्तवनामा वृत्तसेवा
धरणग्रस्तांचे आजपर्यंत ९५%प्रश्न मार्गी लावले असून उर्वरित पाच टक्के प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत.हे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत तसेच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचावे याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. मात्र या आंदोलनावर काही दलाल टीका करीत आहेत मात्र हे आंदोलन पूर्ण नियोजनबद्धरित्या करण्यात येणार असून, जोपर्यंत ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत शासन व प्रशासन जागेवर येऊन धरणग्रस्तांना त्यांचे उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाचे आश्वासन देत नाहीत तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही अशी माहिती वसंतराव मानकुमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महू व हातगेघर धरणग्रस्त व लाभधारक कृती समितीच्या वतीने करहर येथील विठ्ठल मंदिरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मानकुमरे बोलत होते. यावेळी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे, दशरथ कांबळे,भाजपा तालुकाध्यक्ष संदीप परामणे, मच्छिंद्र मुळीक गुरुजी, अजय शिर्के, विकास धोंडे,राजू गोळे,नितीन मानकुमरे व धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
गेल्या 30 वर्षात या दोन्ही धरणांच्या धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाशी वाद घातला, शासन दरबारी प्रश्न सोडवण्यासाठी धडपडलो.या धरणात कावडी आणि वहागाव ही दोन गावे पूर्णतः बाधित झाली.या गावांचे पुनर्वसन अजनूज व अहिरे येथे अतिशय सुंदर रित्या करण्यात आले आहे.त्याचबरोबर अंशतः बाधित असलेल्या गावांना तसेच शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळवून दिला आहे. कावडी गावातील शेतकऱ्यांना एकरी पंधरा लाख रुपये प्रमाणे नुकसान भरपाई मिळवून दिली.आता काही उर्वरित पाच टक्के प्रश्न बाकी राहिले आहेत ते येत्या काही दिवसात मार्गी लागावे आणि या धरणाचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळावे यासाठी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रयत्न करत आहे. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. ‘जे येतील त्यांना सोबत घेऊन आणि जे येणार नाही त्यांच्याशिवाय ‘ हे आंदोलन यशस्वी करून धरणग्रस्त व लाभधारक शेतकरी यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मानकुमरे यांनी स्पष्ट केले.
धरणग्रस्तांच्या उर्वरित पाच टक्के प्रश्नांसाठी विरोध करणाऱ्यांनी केलेल्या ९५ टक्के कामाचे श्रेय देण्याचा मोठेपणा दाखवावा.काही धरणग्रस्तांनी वेळच्यावेळी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. काही प्रश्न जिल्हाधिकारी तसेच प्रशासकीय पातळीवर सुटणारे आहेत तर काही प्रश्नांच्याबाबत शासन स्तरावर निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि ही सर्व प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आंदोलनाची गरज असल्याचे मानकुमरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
या प्रश्नावर राजकारण करण्याची आपणास गरज नाही ज्यांना राजकारण करायचे त्यांनी खुशाल करावे त्याचा आपणास फरक पडत नाही.
महू आणि हातगेघर या दोन्ही धरणांची कामे पूर्ण झाली असून कालव्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत.धरणाजवळ काही भाग कालव्यांना जोडण्याचा बाकी आहे पावसाळा संपल्यानंतर या कामाला प्रारंभ होईल. त्यामुळे येत्या काही दिवसात धरण ग्रस्तांचे उर्वरित प्रश्न सुटणे महत्वाचे आहे. जोपर्यंत धरणग्रस्तांचे प्रश्न पूर्ण मार्गे लागत नाहीत तोपर्यंत या धरणातील पाणी लाभक्षेत्राला मिळू शकणार नाही असेही मानकुमरे यांनी यावेळी स्पष्ट केले.



