प्रशासकीय

वनविभागाने बनवलेल्या चित्रफितींचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

सातारा:वास्तवनामा वृत्तसेवा

     बिबट दिसण्याच्या, मानव बिबट संघर्षाच्या घटना अलीकडे वाढत असून सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये नागरिक धास्तावलेले असतात. शिवाय अलीकडेच भर श्रावणात वणवा लागल्याची बातमीही महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी होती. जिल्ह्यात अलीकडे मानव बिबट संघर्ष कमी करणे आणि वनवणव्यांची संख्या आटोक्यात आणणे हे जनजागृतीचे कार्य वनविभागातर्फे युद्धपातळीवर केले जात असून, त्यासाठी ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सातारा वनविभागाने मानव बिबट संघर्ष कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्रफितींचे अनावरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते संपन्न झाले.

हे व्हिडिओ डिजिटल इंडियाच्या अंतर्गत जागृतीचे कार्य वेगाने होण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे शंभूराज देसाई यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्याचवेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून वनविभागाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. सातारा वनविभागाच्या उपवनसंरक्षकपदी अमोल सातपुते यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर ही पहिलीच जनजागृतीची कृती स्वातंत्र्यदिनी चर्चेचा विषय ठरली.

     जनजागृतीसाठी, नागरिकांच्या जीवाशी तडजोड न करता बिबट प्राण्याचे महत्त्व अबाधित राखून सहजीवनाचा मार्ग कसा अवलंबता येईल आणि त्यासंबंधी काळजी कशी घेता येईल यासंबंधी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी प्रबोधन केले.

 

सादर चित्रींफितींतून उघड्यावर शौचाला जाणे टाळा, शेतकाम करताना एकटे फिरू नका, लहान मुलांना एकटे सोडू नका, अफवा पसरवू नका, उघड्यावर झोपू नका आणि वनवणवे रोखूयात अशा आशयाचे सहा जिंगल सातारा वनविभागाच्या अधिकृत युट्युबवर तसेच इंस्टाग्रामवर स्वातंत्र्यदिनी स. १० वाजता प्रसारित करण्यात आले.

चित्रफितींची निर्मिती अतिशय लक्षवेधी असून चित्रफितींमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे वनविभागाच्या वतीने सर्वांना आवाहन करताना दिसत आहेत.सदर व्हिडीओची निर्मिती अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सर्व वनाधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांना या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यासाठी सातपुते यांच्याकडून कार्यक्रमादरम्यान आवाहन केले आहे.

स्वातंत्र्यदिनी प्रसारित केलेल्या सादर चित्रफितींमुळे समाजातील बिबट्यांविषयीचे गैरसमज आणि आवश्यक सावधानी बाळगण्यासाठीच्या सूचना प्रभावीपणे काम करतील असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितले. कार्यक्रमादरम्यान पोलीस अधीक्षक तुषार दोषी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन आणि इतर वनाधिकारी,पत्रकार अजित जगताप,दत्ता पवार,तुषार तपासे, ओकांर कदम,संतोष नलवडे मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button