जावळीत सभापती पदाच्या खुर्चीसाठी “ओढाताण” सुरू
मतदारांनी नेत्यांच्या डोळ्यात निकाल देऊन घातले 'अंजन'

मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा
वीस मार्चपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती पदाच्या निवडी करण्याचे आदेश आल्यानंतर सर्वत्रच राजकीय खलबते सुरू झाली आहेत अशात जावळी तालुक्यातील मतदारांनी राजकीय मंडळींच्या डोळ्यात ‘अंजन’ घालणारा निकाल दिला आहे. तीन-तीन सदस्य निवडून देत समान बालाबल ठरलेल्या जावळी पंचायत समितीच्या सभापती पदाच्या खुर्चीसाठी आता “ओढाताण” सुरू झाली आहे.त्यासाठी मुंबई, सातारा, जावळी अशा ठिकाणी गुप्त बैठकांचा जोर वाढलेला पाहायला मिळत आहे.
पंचायत समितीची सत्ता कोणत्या एकाच पक्षाकडे मतदारांनी न देता राजकारण्यांनो पाय जमिनीवर ठेवा असा एक प्रकारे संदेशच तालुक्यातील जनतेने निकालातून दिला आहे. सभापती पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने अनेकांनी निवडणुकीपूर्वीच गुडघ्याला ‘बाशिंग’ बांधले होते. अशांना समान जागा निवडून आल्याने ‘बाशिंग’ उतरवण्याची वेळ येते की काय असा राजकीय पेज तालुक्यात पाहायला मिळत आहे.
पंचायत समितीत शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादीचा एक व भाजपचे तीन सदस्य निवडून आलेले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवली असल्याने तीन सदस्य एकत्र मोट बांधून राहिलेले आहेत. ही मोट फोडण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहेत. यासाठी मुंबई सातारा या ठिकाणी गुप्त बैठका सुरू झाले आहेत. भाजपला पंचायत समितीची सत्ता कोणत्याही परिस्थितीत हवी आहे.त्यासाठी तालुक्यातील भाजप नेतेमंडळी जोरदार प्रयत्न करीत आहेत. मात्र सेना-राष्ट्रवादी ईशवरीय चिठ्ठीवरच ठाम राहिलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे सभापती पदाच्या खुर्चीची ही “ओढाताण” कोणत्या पातळीवर जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
निवडणुकीत बघून घेतोची भाषा बैठकीत बसून बोलू यावर आली
निवडणुकीदरम्यान प्रचार सभांमध्ये भाजप, सेना, राष्ट्रवादी नेत्यांनी एकमेकांना बघून घेतो अशी भाषा वापरत खालच्या पातळीवर जाऊन दोन्ही बाजूंनी आरोप- प्रत्यारोप झाले होते.राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना भाजपकडून म्हसवे गटात अखेरच्या क्षणापर्यंत घेरण्याचा कार्यक्रम झाला. त्यामुळे त्यांना केवळ स्वतःच्या कुटुंबातील एक सदस्य निवडून आणता आला.तरीही सेनेने लढवलेले दोन्ही गण जिंकल्याने राष्ट्रवादी प्रदेशअध्यक्षांची मान ताठ राहिली आहे.व समान बलाबल झाल्याने सभापतीपदासाठी आता बघून घेतो ची भाषा बसून बोलू अशा स्टेप वर आली आहे.शशिकांत शिंदे यांचा संपूर्ण गट संपवण्याचे षडयंत्र करणाऱ्या भाजपसोबत शशिकांत शिंदे सेनेला घेऊन कोणता निर्णय घेतात याकडेच तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
विठ्ठलशेठ चा एक हाती कारभार नडला
या निवडणुकीत माथाडी कामगार नेते दत्ताशेठ भालेघरे, दत्ताशेठ गावडे, राष्ट्रवादीचे विठ्ठलशेठ गोळे असे ‘शेठ’ मंडळी उतरली होती. यामध्ये दोन दत्ता शेठ यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र विठ्ठलशेठ गोळे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली. परंतु त्यांच्या एक हाती कारभारामुळे सामान्य कुटुंबातील गोरख महाडिक यांनी त्यांचा पराभव केला व विठ्ठल शेठ गोळे यांनी पंचायत समितीतील सत्तेची समीकरणे बदलली. विठ्ठल शेठ गोळे निवडून आले असते तर एक हाती सत्ता मिळाली असती.तर दुसरीकडे कुसुंबी गटातील कुसुंबी व आंबेघर तर्फ मेढा गणातील सेनेचे सदस्य निवडून आणल्याने तालुक्याच्या राजकारणात एन्ट्री केलेल्या अंकुश बाबा कदम व दुसऱ्या फळीत काम करणारे साधू चिकणे यांचे राजकीय महत्त्व वाढले आहे.



