वसंतराव मानकुमरेंच्या पराभवाचे प्रदेशअध्यक्षांचे स्वप्न ‘स्वप्नच’ ठरले
संपूर्ण कुटुंब प्रचारात उतरूनही मानकुमरेंचाच विजय तर गणात गोळेंचा पराभवच झाला

मेढा :वास्तवनामा वृत्तसेवा
जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक निकालाने जावळीतील अनेक राजकीय समीकरण बदललेली पाहायला मिळत आहेत. मात्र राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हसवे गटात भाजपचे नेते वसंतराव मानकुमरेंचा पराभव करण्याचे जे स्वप्न पाहिले ते फक्त स्वप्नच ठरले.अख्खे शिंदे कुटुंब प्रचारात उतरूनही ते आपले शिलेदार खर्शी-बारामुरे गणातील उमेदवार विठ्ठल गोळेंचा देखील पराभव प्रदेशाध्यक्ष रोखू शकले नाहीत. मात्र कुसुंबी गटात अंकुश कदम यांनी सर्व यंत्रणा राबवत विजयश्री खेचून आणला. त्यामुळे अंकुश कदम हेच या निवडणुकांत सर्वात ‘सरस’ठरले आहेत.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदारअसताना शशिकांत शिंदे हे प्रत्येक गावात सत्ताधारी व विरोधक यांच्यामधील प्रमुख कार्यकर्त्यांच्या पाठीशी रहात ‘हा-ही’ माझा व ‘तो-ही’माझा म्हणत राजकारण करायचे. त्यांची हीच पद्धत त्यांना जावळी तालुक्यात अडचणीची ठरली व वसंतराव मानकुमरे यांचा पराभव करणारच असाच चंग बांधलेल्या शिंदेंना म्हसवे गटात योग्य उमेदवारच मिळाला नाही.
जर सचिन गोगावले हे प्रबळ उमेदवार होते तर त्यांचा जातीचा दाखला निवडणुकीपूर्वीच काढणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष का झाले. ऐनवेळी उमेदवार का बदलला या सर्व राजकीय परिस्थितीमुळे म्हसवे गटात आ. शिंदे यांची ताकद क्षीण झाली. मुरब्बी मानकुमरेंनी हे ओळखून आपले उमेदवार निश्चित केले व कामाला देखील सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा पराभव करणे प्रदेशअध्यक्षांचे स्वप्न स्वप्नच ठरले.
शिंदेंची अख्खी फॅमिली म्हसवे गटात उतरूनही वसंतराव मानकुमरे २२२७ मतांनी विजयी झाले, तर शिंदेंच्या निवडणुकीच्या प्रचाराची सूत्रे हाताळणारे माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस विठ्ठल गोळे हे बेसुमार पैशांचा वापर करूनही स्वतःची प्रचार यंत्रणा राबवण्यात फेल ठरले.त्यांचा सामान्य कुटूंबातील भाजपचे गोरख महाडिक यांनी पराभव केला. एकीकडे ऋषिकांत शिंदे, तेजस शिंदे व दस्तूर खुद्द प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे म्हसवे गटातील गावागावात पोहोचून मतदारांना आवाहन करत होते. मात्र तरी देखील केवळ म्हसवे गणातील शिल्पा शिंदे यांना अवघ्या १९५ मतांनी विजयी करण्याचे अल्प समाधान शिंदे कुटुंबीयांना मिळाले.प्रदेशाध्यक्षांचे कुडाळ गटाकडे सोयीस्कर दुर्लक्ष
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या तुतारीवरच कुडाळ गटात तीन उमेदवार उभे करण्यात आले होते. मात्र या गटाकडे शिंदेंनी सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले. त्यामुळे किमान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या गटात नेमके शिंदेंचे शिलेदार कोण व भाजपचे शिलेदार कोण हे ओळखावे.
अंकुश कदमच ठरले ‘सरस’
मेढा नगरपंचायत निवडणुकीत देखील प्रदेशाध्यक्षांना केवळ एकच नगरसेवक निवडून आणण्यात यश आले होते. तर सेनेने संपर्कप्रमुख अंकुश कदम यांच्या नेतृत्वाखाली पाच नगरसेवक निवडून आणले. अशीच परिस्थिती जिल्हा परिषद निवडणुका दिसून आली. केवळ एक पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यात प्रदेशाध्यक्षांना यश आले. तर अंकुश कदम यांनी सामान्य कुटुंबातील चेहऱ्यांना संधी देऊन संपूर्ण कुसुंबी गट ताब्यात घेण्यात यश मिळवले.त्यामुळे या निवडणुकीतही प्रदेशाध्यक्षांपेक्षा अंकुश कदमच ‘सरस’ ठरले. तर सभापती निवडीत देखील अंकुश कदम हेच सर्वश्री निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.



