राजकीय

समान बलाबल असलेल्या जावळी पंचायत समितीत सभापती कोणाचा होणार ?

ईश्वरीय चिठ्ठीवर महाआघाडी ठाम मात्र भाजप धोका स्वीकारणार का

मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा

जावळी पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप गटाला मोठा धक्का देत शिवसेना,राष्ट्रवादी महाआघाडीने पंचायत समितीच्या तीन जागांवर विजय मिळवला.तर भाजपने तीन जागांवर विजय मिळवल्याने सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार? समान बलाबल असल्याने नेमके सभापतीपद कोणाकडे राहणार याची उत्सुकता जावळीकरांना लागली आहे.

जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत जावळीत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. तर भाजप विरोधामध्ये या महाआघाडीने मोठे आव्हान निर्माण केले होते. यामध्ये सायगाव चारुशीला पवार, कुडाळ सौरभ शिंदे, खर्शीबारामुरे गणात गोरख महाडिक या भाजप उमेदवारांनी विजय मिळवला.तर सेनेच्या कुसुंबी गणातून  सुनीता दुंदळे ,आंबेघर तर्फ मेढा अतिष कदम,तर म्हसवे गणातून राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे विजयी झाल्या. त्यामुळे पंचायत समितीच्या सत्तेत भाजप व महाआघाडीचे समान बलाबल झाले आहे.

कोणत्याही एका पक्षाला सत्ता स्थापन करता येणार नसल्याने नेमका सत्ता स्थापनेचा मध्यग काय साधला जातो याकडेच तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

ईश्वरी चिठ्ठीवर सभापती ठरणार का ?

हुमगाव येथे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ईश्वरी चिठ्ठीचा उल्लेख करीत कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत चर्चा होणार नाही. असे संकेत दिले होते. त्यामुळे भाजप पक्षाची चर्चेची द्वारे बंद झाली आहेत.मात्र ईश्वरी चिठ्ठीत महाआघाडीची चिट्ठी निघाल्यास भाजप विरोधात बसण्यास तयार राहील का?हाच प्रश्न सध्या जावळी तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

  महाआघाडी भाजपला खिंडीत पकडणार

महाआघाडीने भाजप विरोधात तालुक्यात एक जिल्हा परिषद गट व तीन पंचायत समिती गण निवडून आणले आहेत. त्यामुळे समान बलाबल झालेल्या पंचायत समितीतील सत्ता मिळवण्यासाठी महाआघाडी भाजपला खिंडीत पकडू इच्छिते. भाजपला सत्ता हवी असल्यास महाआघाडीशी चर्चा करावी लागणार व या चर्चेत महाआघाडी प्रथम सभापतीपद मागण्याच्या तयारीत असल्याची समजते. त्यामुळे भाजप या अटीवर चर्चेस तयार राहणार का? हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सभापतीपदाबाबत भाजप पक्षाकडून सर्वस्वी निर्णय बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच घेणार, तर महाआघाडीच्या वतीने शिवसेना संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम व राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हेच सभापती पदाबाबत निर्णय घेणार.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button