
मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा
जावळी तालुक्यात सत्ताधारी भाजप पक्षाला खिंडार पडले असून तालुक्यातील कुसुंबी गटात शिवसेनेने प्रवेश केला तर म्हसवे, कुडाळ गटात भाजपला विजय मिळवण्यात यश आले. मात्र गटातील म्हसवे,आंबेघर तर्फ मेढा,कुसूंबी पंचायत समिती गण भाजपच्या हातातून निसटल्याने पंचायत समितीच्या सत्तेला धक्का बसला.दोन जिल्हा परिषद गटांवर भाजप तर एका गटावर शिवसेनेने झेंडा फडकवला.जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांचा अनपेक्षित रित्या कुसूंबी गटात पराभव झाला.
प्रचाराच्या सुरुवातीपासूनच जावळी तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसाठी, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजप तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीसाठी ताकद लावली होती. या निवडणुकीत शिवसेना,राष्ट्रवादी एकत्रपणे लढल्याने भाजपच्या समोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. कुसुंबी जिल्हा परिषद गट संपूर्णपणे शिवसेनेला सोडण्यात आला होता. तर म्हसवे गट राष्ट्रवादी पक्षाला सोडण्यात आला होता.
प्रचार सभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या.त्यामुळे तिन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे ज्ञानदेव रांजणे यांच्या सुविद्य पत्नी अर्चना रांजणे यांचा अनपेक्षित रित्या पराभव झाला. कुसुंबी गटात शिवसेनेच्या कविता ओंबळे विजयी झाल्या तर आंबेघर तर्फ मेढा गणात सेनेचे आतिश कदम कुसुंबी गणात सेनेच्या सुनीता दुंदळे या विजयी झाल्या.
म्हसवे गटातील निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीची ठरली. याठिकाणी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची तर बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती, या गटात भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांना रिंगणात उतरवले होते. तर् महाआघडीकडून शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदीप पवार हे रिंगणात होते,सुरुवातीच्या काळात याठिकाणी मानकुमरे यांच्याविरोधात मोठा अंडरकरेंट होता, पण तो कमी करण्यात ते पुरेपूर यशस्वी ठरले, संदीप पवार यांच्यासाठी आ. शशिकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी ताकद लावली होती पण मानकुमरे यांचा अनुभव याठिकाणी कामी आला व ते सहीसलामत बाहेर पडले,
म्हसवे गणात आ. शिंदे यांच्या कुटुंबात उमेदवारी असल्याने याठिकाणी ही चुरस निर्माण झाली होती. पण अखेरच्या टप्प्यात आमदार शिंदेंनी काही गणिते जुळवून ही जागा पदरात पाडून घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा याठिकाणी शिरकाव झाला,खर्शी बारामुरे गणात भाजप च्या गोरख महाडिक यांनी अनपेक्षित पणे विजय मिळवत आमदार शिंदेचे विश्वासू विठ्ठल गोळेना धूळ चारली,
कुडाळ गटातील निवडणूक ही पहिल्यापासूनच एकतर्फी राहिली,भाजप च्या जयश्री गिरी यांना महाआघाडी च्या पुनम नायकुडे यांनी दिलेले आव्हान तोकडे पडले,तर कुडाळ गणात सौरभ शिंदेचा विजय हा एकतर्फी ठरला, याच गटातील सायगाव गणात चारुशीला पवार यांनी बाजी मारत कुडाळ गटात भाजपची ताकद दाखवून दिली.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख अंकुश कदमच ठरले कुसूंबी गटाचे किंगमेकर
कुसुंबी जिल्हा परिषद गटात शिवसेनेने घवघवीत यश मिळवले असून संपूर्ण जिल्हा परिषद गट शिवसेनेच्या ताब्यात आणण्यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख अंकुश कदम यांना यश आले. निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून अंकुश कदम यांचे या गटातील मायक्रोप्लॅनिंग यशस्वी ठरले.त्यांना केळघरच्या पार्टे कुटूंबियांची, तसेच राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष साधू चिकणे यांची मिळालेली साथ देखील या यशासाठी मोलाची ठरली.
विजयी उमेदवार व मिळालेली मते
जिल्हा परिषद गट कुडाळ जयश्री गिरी भाजप (११९१७),म्हसवे गट वसंतराव मानकुमरे भाजप ९८९८,कुसुंबी गट कविता ओंबळे शिवसेना ८९५१,
पंचायत समिती गण
कुडाळ गण:-सौरभ शिंदे,भाजप ५२०९, सायगाव गण चारुशीला पवार भाजप ६१२७,
म्हसवे गण शिल्पा शिंदे राष्ट्रवादी ४८५०,
खर्शी बारामुरे गण गोरख महाडिक भाजप ४४२९,आंबेघर तर्फ मेढा गण आतिश कदम शिवसेना ५१७५, कुसूंबी गण सुनिता दुंदळे शिवसेना ४२४९.
तिन्ही पक्षांकडून पैश्यांचा बेसुमार वापर
जावळी तालुक्यातील निवडणूकांचे निकाल हे अलीकडच्या काळात आर्थिक गणितांवर अवलंबून रहात आहेत.आणि हे ओळखून सेना,भाजप,राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी येथील निवडणुकांत पैश्यांचा वापर बेसुमार केला गेला होता.



