विठ्ठल गोळेंच्या विजयासाठी ऋषिकांत शिंदे,तेजस शिंदे प्रचारार्थ मैदानात
हातगेघर,कावडीत राष्ट्रवादीच्या रॅलीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

करहर :वास्तवनामा वृत्तसेवा
महाआघाडीचे खर्शी बारामुरे गणातील उमेदवार विठ्ठलराव गोळे याच्या विजयासाठी राष्ट्रवादी प्रदेशअध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांच्या कुटूंबातील व बंधू माथाडी नेते ऋषिकांत शिंदे,व चिरंजीव तेजस शिंदे हे प्रचारार्थ उतरले असून आज सोमवारी भाजप नेते वसंतराव मानकुमरे यांच्या होमपीचवरच आज जबरदस्त शक्तीप्रदर्शन राष्ट्रवादी कडून करण्यात आले.
गणाचे उमेदवार विठ्ठल गोळे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेस हातगेघर,कावडीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिदे यांचे बंधू माथाडी नेते ऋषीकांत शिंदे, पुत्र तेजस शिंदे या पदयात्रेत सामील झाल्याने खर्शी बारामुरे गणात चैतन्य निर्माण झाले आहे.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे गाव हुमगांव हे म्हसवे गटात येत असल्याने व आमदार शिंदेचे विश्वासू सहकारी विठ्ठलराव गोळे या गणातून रिंगणात उतरल्याने आमदार शिंदेनी याठिकाणची लढाई प्रतिष्ठेची केली आहे.आज सकाळी आंबेघर येथून या पदयात्रेस सुरुवात होऊन ती भोगवली, हातगेघर, कावडी,विवर,पानस मार्गे पिंपळी व त्यानंतर करहर येथे या पदयात्रेचा समारोप झाला.
या पदयात्रेस तरुण वर्ग तसेच महिलांचा मोठा प्रतिसाद पहायला मिळाला. उमेदवार विठ्ठलराव गोळे यांनी या गणातील महू हातगेघर धरणप्रश्न,वीज, पाणी,आरोग्य यासारखे मुलभूत प्रश्न, पर्यटन विकास व रोजगाराचे मुद्दे मतदारांना पटवून दिले त्यामुळे गोळे यांना मताधिक्याने या गणातून निवडून देण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधल्याचे दिसून येत आहे.
यावेळी शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष नितीन गोळे, मनसे तालुका अध्यक्ष अविनाश दुर्गावळे, राष्ट्रवादी जावळी तालुका अध्यक्ष सुरेश गोळे, प्रतापगड सहकारी साखर कारखाना संचालक रामदास पार्टे, जावली तालुका गट प्रमुख गोपाळ बेलोशे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
खर्शी-बारामुरे गणातील प्रत्येक गावात माझा जनसंपर्क असून येथील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी कायम माझ्या परीने प्रयत्न,सहकार्य करीत आलो आहे.विरोधकांच्या भूलथापांना धरणग्रस्त आता बळी पडणार नाहीत,व दहशत,दादागिरी झुगारून येथील जनता आपल्या ‘कामाचा माणूस’ओळखून माझ्या पाठीशी ठाम राहतील.
विठ्ठल गोळे
राष्ट्रवादी खर्शी बारामुरे गण उमेदवार



