प्रदेशअध्यक्षांच्या घरातील शिल्पा शिंदेंचे म्हसवे गणात तगडे आव्हान

कुडाळ :वास्तवनामा वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने म्हसवे गणातून थेट प्रदेशअध्यक्ष आ.शशिकांत शिंदेंच्या घरातील सौ.शिल्पा मिलिंद शिंदे यांनाच मैदानात उतरवलं आहे.त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताच निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.मतदारसंघात महिलावर्गाशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला आहे.
शिल्पा शिंदे या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदेच्या कुटुंबातील असून आमदार शिंदेचा राजकीय वारसा त्यांना लाभला आहे.आमदार शिंदेनी म्हसवे गटातील निवडणुक प्रतिष्ठेची केली असून, यापूर्वीच त्यांनी हुमगांव येथे झालेल्या मेळाव्यात जावळीचा स्वाभिमान जपण्यासाठी मैदानात उतरत असल्याचे सूतोवाच केले होते.त्यामुळे ते गटात व गणात मातब्बर उमेदवार देणार अशी चर्चा होती.त्यानुसार त्यांनी उमेदवारही निश्चित केले आहेत. आमदार शशिकांत शिंदे च्या कुटुंबातील महिला आजवर कोणत्याच निवडणुक रिंगणात नव्हत्या,मात्र सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळत असलेला प्रतिसाद पाहता आमदार शिंदेनी कुटुंबातील व्यक्तीलाच निवडणूकीत उतरवले आहे.
हुमगांव आखाडे,इंदवली,कोलेवाडी,जरेवाडीत आमदार शशिकांत शिंदेना मानणारा मोठा वर्ग असल्याने व बर्याच वर्षानंतर आमदार शिंदेच्या घरातील सदस्य निवडणुकीत असल्याने मतदारसंघातही उत्साहाचे वातावरण आहे.शिल्पा शिंदे या उच्चशिक्षित असून पती डाॅक्टर मिलिंद शिंदेनी यापूर्वीदेखील आमदार शिंदेच्या सर्व निवडणुकीत महत्वाची जबाबदारी सांभाळल्याने ते म्हसवे गटात चांगले परिचित आहेत. त्यामुळेच शिल्पा शिंदे या गणातून मोठा विजय संपादन करतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.



