कुडाळ गटाच्या उमेदवारीसाठी आनेवाडीकर एकवटले
दादा पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी घेतली मंत्री शिवेंद्रसिंहराजेंची भेट

सातारा :वास्तवनामा वृत्तसेवा
कुडाळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारीसाठी आनेवाडीकर ग्रामस्थ एकवटले असून, आनेवाडीतून योगिता रमेश फरांदे, शिल्पा मनेश फरांदे यांच्या उमेदवारीची एकमुखाने मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे करण्यात आली.आनेवाडीचे जेष्ठ नेते व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थांनी मंत्री भोसले यांची रविवारी भेट घेतली.
सायगाव विभागातील आनेवाडी हे बाजारपेठेचे व राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळखले जाते. गेली दहा वर्षे सायगाव गणातून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जो उमेदवार दिला त्याचे निष्ठेने काम सायगाव विभागातील मतदारांनी, नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी केले. मात्र एकाच कुटुंबात सातत्याने उमेदवारी दिली जाऊ नये. यावेळी इतर सर्वसामान्य कार्यकर्त्यास उमेदवारी दिली जावी असा सूर संपूर्ण कुडाळ गटातून उमटत आहे.
अशा परिस्थितीत आनेवाडीकर ग्रामस्थ कुडाळ गटातील ओबीसी महिला आरक्षित जागेवर उमेदवारी मिळवण्यासाठी सरसावले आहेत. संपूर्ण ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेत योगिता रमेश फरांदे व शिल्पा मनेष फरांदे ही दोन नावे उमेदवारीसाठी सुचवली असून अनेवडीला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी, अशी विनंती बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे केले आहे.
यावेळी सरपंच वैशाली फरांदे, उपसरपंच उपसरपंच अमित फरांदे,आनेवाडी विकास सोसायटी चेअरमन विवेक पवार, व्हाईस चेअरमन विजय फरांदे, बाळासाहेब शिंदे, एडवोकेट मनोहर फरांदे, शिवाजी फरांदे, सुरेश फरांदे, दत्तात्रय फरांदे, अविनाश धुमाळ, नलिनी चव्हाण, नीता जाधव, मनोज फरांदे, पूजा फरांदे, हेमलता फरांदे, हरिश्चंद्र फरांदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



