राजकीय

मेढा नगरपंचायतीची नगरपालिका करण्यावर भर राहील : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले…

थेट नगराध्यक्ष रूपाली वारागडे यांनी स्विकारला पदभार...

 

मेढा :वास्तवनामा वृत्तसेवा

नुकत्याच झालेल्या मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीत मेढा वासियांनी नगराध्यक्ष व अकरा नगरसेवक भाजपाचे निवडून दिले असून विकासाच्या बाबतीत मेढा नगरवासीयांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू करून मेढा नगरपंचायत नगरपालिका कशी होईल यावर आमचा भर राहील अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.

मेढा नगराध्यक्ष पदाचा पदभार ग्रहण समारंभ आज झाला.यावेळी नगराध्यक्ष रूपाली वारागडे यांनी नगराध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला.कार्यक्रमास जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे,बाजार समिती सभापती जयदीप शिंदे,सागर धनावडे,कांतिभाई देशमुख,नगरसेवक शिवाजीराव देशमुख,विकास देशपांडे, शिवाजी गोरे,रिकी तिवाटने,आनंदी करंजेकर,छकुली करंजेकर,अनिल शिंदे,कल्पना जवळ,गीता लोखंडे, यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकनगरसेविका कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले, मेढा शहराच्या विकासासाठी जो शब्द आम्ही दिला आहे. तो शंभर टक्के पूर्ण करू. निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवून मेढा नगरपंचायतीवर सत्ता मिळवण्यात यश मिळवले. मात्र काहींनी आपल्यातच राहून गमतीजमती केल्या आहेत. आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांमधील अंतर्गत मतभेदामुळे समोरील पक्षाला काही जागा मिळवता आल्या. असा उल्लेख करीत गमतीजमती करणाऱ्या कार्यकर्त्यांना मंत्री भोसले यांनी सुचक इशारा दिला. तर निवडून दिलेल्या नगरसेवकांनी देखील शहराचा विकासाला प्राधान्य देऊन कामे करावीत. विरोधी नगरसेवकांच्या प्रभागात देखील शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आम्ही विकास कामे राबवण्यावर भर देऊ अशी ग्वाही देखील मंत्री भोसले यांनी यावेळी दिली.

मेढ्यातील अत्याधुनिक स्मशानभूमीचा महत्त्वाचा विषय असून सुसज्ज घाटा सहित सुंदर अशी स्मशानभूमी लवकरच उभी करू, नगरपंचायतीची स्वतःची इमारत उभी राहत आहे. तिच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ही लवकरच करू, शहरातील रस्ते लवकर खराब होऊ नयेत म्हणून काँक्रीटचे केले जातील. मेढ्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जागेची उपलब्धता पाहून ऑडिटोरियम उभे करण्यासाठी प्रयत्न करू.मेढा आता शहर झाले असून मोठ्या शहरांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून आतापासूनच आपल्याला भविष्यातील नियोजन करावे लागेल.

यावेळी त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले.

वारागडे कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला

थेट नगराध्यक्षपदी पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून आज रूपाली वारागडे यांनी पदभार स्वीकारला. शहराच्या प्रथम नागरिक म्हणून पदभार स्वीकारत असताना रूपाली वारागडे यांचे पती संतोष वारागडे,सासरे चंद्रकांत, सासू यमुनाबाई यांच्यासह कुटुंबीयांचा आनंद याप्रसंगी द्विगुणीत झालेला पाहायला मिळाला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button