पृथ्वीराजने मिळवलेले यश तरुणांसाठी आदर्शवत : मच्छिंद्र मुळीक

मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा
जावळी तालुक्यातील सायगाव येथील पृथ्वीराज हिंदूराव कदम याची एअर फोर्स मध्ये फ्लाईंग ऑफिसर क्लास वन पदी निवड झाली असून,त्याने मिळवलेल्या या यशाचा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे आवाहन शिक्षक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मुळीक यांनी केले.
सायगाव विभागातील शिक्षकांच्या वतीने कदम यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. सायगाव सारख्या गावात राहून पृथ्वीराजने एअर फोर्स विभागाची परीक्षा उत्तीर्ण होऊन उत्तुंग यश मिळवले असून त्याची फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. ही सायगाव विभागासाठी गौरवास्पद बाब आहे. असे प्रतिपादन करीत त्याच्या या निवडीमुळे या विभागामध्ये आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणार असल्याची ग्वाही मुळीक यांनी यावेळी दिली.
यावेळी पृथ्वीराज कदम याचा सायगाव विभागातील शिक्षकांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख संभाजी भोसले, मिलिंद जगताप, धैर्यशील भोसले,रोहिदास भोसले, विनायक चोरट, लक्ष्मण कदम, ज्ञानेश्वर आगुंडे, राहुल देशमाने, सुनील राजमाने यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.



