
मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा
राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या मेढा नगरपंचायत निवडणुकीत ४०२६ मतदारांपैकी ३३९१ मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. एकूण ४०२६ पैकी ३३९१ मतदारांनी यामध्ये पुरुष १९३६ पैकी १६६९ तर महिला २०९० पैकी १७२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.एकूण ८४.२३ टक्के इतके मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत कोळेकर यांनी दिली.ही मतदान प्रक्रिया आज मेढा शहरात शांततेत पार पडली.खुल्या प्रवर्गातील महिला नगराध्यक्ष पद आरक्षण असल्याने सर्वाधिक महिला मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.
सकाळपासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. दिवसभरात उमेदवारांचे प्रतिनिधी आपापल्या प्रभागातील मतदार घराघरातून बाहेर आणून मतदान करून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळपासूनच मतदानाची टक्केवारी वाढत होती. प्रशासनाने जिल्हा परिषद शाळा, वेण्णा विद्यामंदिर व इतर ठिकाणी एकूण १७ बूथ मतदानासाठी उभारले होते. प्रत्येक बूथ वर दोन झोनल अधिकारी व इतर पाच कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मतदान केंद्राबाहेर शंभर मीटरच्या आत प्रवेश करण्यास पोलिसांनी सक्त मनाई केली होती. त्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली.
वेण्णा विद्या मंदिर येथील बुथबाहेर शिवसेना उमेदवार संदीप जवळ आणि भाजपा उमेदवार विकास देशपांडे यांच्यात किरकोळ बाचाबाचीचा प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान केंद्रावर शिवसेना शिंदे गट व भाजपा च्या नेत्यांनी भेटी देऊन आपापले उमेदवारांना मार्गदर्शन केले. सायंकाळी सव्वापाच वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा परिषद शाळा मेढा व वेण्णा विद्यामंदिर या ठिकाणच्या बूथवर येत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत मतदानाविषयी जाणून घेतले.तर शिव-सेनेचे संपर्कप्रमुख अंकुशबाबा कदम,एकनाथ ओंबळे हे दिवसभर मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.
मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्यासह तीन पोलीस उपनिरीक्षक, ५६ पोलीस, ६८ गृहरक्षक दलाचे जवान आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान एवढा मोठा फौजफाटा मतदान प्रक्रियेच्या बंदोबस्तासाठी लावण्यात आला होता.
दम + रसद + जनशक्ती = सत्ता ? निकालाचे राहणार सूत्र
नगरपंचायतीची निवडणूक भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (श.प.गट)यांनी प्रतिष्ठेची केली होती. परंतु यामध्ये तुल्यबळ लढत ही भाजप विरुद्ध शिवसेना अशीच झाली आहे. प्रचारादरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप नेत्यांनी एकमेकांवर केले. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली होती. दम + रसद + जनशक्ती = सत्ता ? असे या निवडणुकीला स्वरूप निर्माण झाले होते.त्यामुळे ३३९१ मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूने कल दिला आहे. हे २१ डिसेंबर रोजी मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे.तोपर्यंत तर केवळ आकड्यांची बेरीज वजाबाकी उमेदवारांकडून केली जाणार आहे.व यामुळेच निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे.



