बोंडारवाडी धरण पूर्ण करणे हीच कै.मोकाशी यांना खरी श्रद्धांजली
बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ; नांदगणे येथे शेतकरी मेळावा संपन्न

मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा
बोंडारवाडी धरण हे जावळी तालुक्यातील ५४ गावांसाठी महत्वाचा प्रकल्प आहे. हे धरण पूर्ण होण्यासाठी कै. विजयराव मोकाशी यांनी या धरणासाठी जनआंदोलन उभे केले होते. राज्य सरकारच्या माध्यमातून हे धरण पूर्ण करणे हीच कै. विजयराव मोकाशी यांना खरी श्रद्धांजली असणार आहे. सर्वांना सोबत घेऊन बोंडारवाडी धरण प्रकल्प होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही,अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक कै. विजयराव मोकाशी यांच्या तृतीय स्मृतिदिनामित्त नांदगणे येथील आयोजित शेतकरी मेळाव्यात मंत्री भोसले बोलत होते. याप्रसंगी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, राजेंद्र मोकाशी, दत्तात्रय पवार, मोहनराव कासुर्डे,अंकुशबाबा कदम,आदिनाथ ओंबळे, वैभव ओंबळे ,कुणाल मोकाशी आदींची उपस्थिती होती.
मंत्री भोसले म्हणाले,सुरुवातीला पिण्याच्या पाण्यासाठी या धरणाला मंजुरी मिळाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जलसिंचन विभागाकडून हे धरण पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला.शासन व प्रशासन या धरणाबाबत सकारात्मक आहे.बाधित ग्रामस्थांशी संवाद साधून योग्य तो तोडगा काढला जाईल. या धरणाचे नाव विजयसागर जलाशय ठेवून कै. विजयराव मोकाशी यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली .
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, आधी पुनर्वसन मग धरण हा शासनाचा कायदा असून केवळ ट्रायलपीट झाली म्हणजे धरण होत नाही. त्यामुळे ट्रायल पिटसाठी ग्रामस्थांनी विरोध करू नये. पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग धरणाचे काम सुरू होईल. बाधित ग्रामस्थांचे योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.
अंकुश बाबा कदम म्हणाले ५४ गावातील जनतेसाठी हे धरण नवसंजीवनी ठरणार आहे. त्यामुळे बाधित गावांचे प्रश्न सोडवून धरण पूर्ण होईपर्यंत आपण एकसंघपणे लढा देत राहू. या धरणामुळे केळघर, कुसुंबी, म्हाते या विभागातील शेतकऱ्याच्या शेती पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.त्यामुळे हा लढा धरण पूर्णत्वाकडे जाईपर्यंत एकसंघपणे लढत राहूया.
प्रास्ताविकात आदिनाथ ओंबळे म्हणाले, या प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. त्या शेतकऱ्यांना योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन व्हावे ही कृती समितीची पहिल्यापासून भूमिका असून बाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ही कृती समिती काम करणार आहे.
या मेळाव्यास ५४ गावातील सरपंच, उपसरपंच, प्रमुख कार्यकर्ते, युवक, महिला, व मुंबई,पुणे स्थित कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. एकनाथ सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र जाधव यांनी आभार मानले.



