राजकीय

धरणग्रस्तांसाठी संघर्ष करणारे मानकुमरे पाण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर

संपूर्ण तालुक्यातून मानकुमरेंच्या पाठीशी कार्यकर्ते-शेतकऱ्यांनी बांधली वज्रूमूठ

मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा

    जावली तालुका हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात कोयना व कण्हेर ही मोठी धरणे असून, या धरणांचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे १९९५ च्या युती शासनाच्या दरम्यान तालुक्यात महू व हातगेघर हे लघुप्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले. तब्बल ३० वर्षाहून अधिक कालावधी उलटला तरी देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी न पोहचल्याने आतापर्यंत येथील धरणग्रस्तांसाठी संघर्ष करणारे वसंतराव मानकुमरे हे आता शेतकऱ्यांच्या या धरणातील पाण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या पाठीशी तालुक्यातील लाभक्षेत्रातील सर्व शेतकरी-कार्यकर्त्यांनी वज्रमुठ बांधलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाला आता धोरणात्मक निर्णय घेणे भाग पडणार आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने महू व हातगेघर ही धरणे उभारण्याच्या कामाला युती सरकारमध्ये सुरुवात झाली. तेव्हाही पुनर्वसनांच्या प्रश्नांवरून शिवसेनेत पंचायत समितीचे सभापती पदावर काम करणारे वसंतराव मानकुमरे हे आपल्या विभागातील धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरले होते. केवळ रस्त्यावर उतरले नाहीत तर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न देखील सोडवण्यात त्यांना यश आले. अनेकांनी फलटण, खंडाळा तालुक्यात चांगल्या जमिनी मिळवल्या.

पुनर्वसनासाठी रस्त्यावर उतरणारे मानकुमरे आता लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर

वसंतराव मानकुमरे यांचा राजकीय संघर्ष हा संपूर्ण तालुक्यांनी पाहायला आहे. विकासात्मक वाटचाल करताना ते नेहमी विरोधकांच्या टिकेच्या धनी झाले आहेत.पण जे काहीच करत नाहीत अशांच्या टिकेकडी दुर्लक्ष करीत मानकुमरे यांनी तालुक्यातील जनतेप्रती आपली निष्ठा कायम ठेवून काम करणे सोडले नाही. पुनर्वसन झाले, दोन्ही धरणे उभी राहिली, पाणीही साठले मग या पाण्याचा वापर कधी होणार? असा खडा सवाल प्रशासनाला विचारत मानकूमरे यांनी लाभ क्षेत्रातील ४१ गावांसाठी आता “एल्गार” पुकारला आहे.या एल्गारला सायगाव, कुडाळ,दरे बु,सोमर्डी, हुमगाव परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी वज्रमुठ बांधली आहे. त्यामुळे ३ सप्टेंबर पासून होणाऱ्या आंदोलनात शेतकरी आपली ताकद दाखवून देणार.या आंदोलना संदर्भात सायगाव विभागातील प्रभुचीवाडी येथे शेतकरी कार्यकर्त्यांची एक बैठक देखील संपन्न झाली. बहुसंख्य शेतकरी या आंदोलनात उतरणार असल्याची ग्वाही या बैठकीत शेतकऱ्यांनी दिली.

 मानकुमरे यांच्या भूमिकेचे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून स्वागत

महू व हातगेघर या दोन्ही धरणांच्या लाभक्षेत्रात जवळपास ४१ गावे येतात. आज या गावांमध्ये पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र धरणांच्या सांडव्याजवळ काम अर्धवट असल्याने पाणी पुढे जात नाही. त्यामुळे ३ सप्टेंबर पासून “एल्गार” आंदोलन पुकारले गेले आहे. गणेश विसर्जनापर्यंत जलसमाधी घेण्यापर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागास धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. वसंतराव मानकुमरे तसेच तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी पाण्यासाठी घेतलेल्या या भूमिकेचे लाभॆत्रातील ४१ गावांमधील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button