शशिकांत मोठा झाला तर आपलं अस्तित्व संपेल म्हणून मला अडवण्याचे काम : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने आज मेढा येथे नागरी सत्कार संपन्न

मेढा :वास्तवनामा वृत्तसेवा
शशिकांत शिंदे मोठा झाला तर आपलं अस्तित्व संपेल या द्वेषभावनेतून आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये आपल्याच मंडळींनी मला अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु मी माझी शरद पवारांप्रती असलेली निष्ठा कायम ठेवली. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माझी निवड हे माझं मी भाग्य समजतो. शरद पवार ही माझी ऊर्जा असून जावळीची जनता मी जाऊन सोळा वर्षे झाली तरी सुद्धा तेवढेच माझ्यावर आजही प्रेम करत आहे. जावळीकरांनी एकदाच अजून संधी द्यावी जावळीचा संपूर्ण कायापालट करेन अशी ग्वाही राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी स्वाभिमानी नेते आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाल्याबद्दल स्वाभिमानी जावळीकरांच्या वतीने त्यांचा मेढा येथे आज भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार शिंदे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाला माजी आ.सदाशिव सपकाळ, तेजस शिंदे,ऋषिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार, माजी सभापती बापूराव पार्टे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष सुरेश पार्टे, महिला अध्यक्षा रूपाली भिसे, प्रदेश उपाध्यक्ष समिंद्रा जाधव, आनंदराव जुनघरे, राजुशेठ धनावडे, बुवासाहेब पिसाळ नितीन गोळे, संतोष चव्हाण,संतोष कदम, शंकरराव पवार, वसंत शिंदे, राम कदम, राजू जाधव,अतिष कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले माझ्यावर दोन दिवस जावळीतून जी टीका केली गेली २५% जनता पाठीशी नसलेल्या पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष आहे. मात्र त्यांना मी आज एकच सांगू इच्छितो पंचवीस टक्क्यावरून १०० % टक्के पक्षाची ताकद वाढवण्याची जबाबदारी मी आता घेतली आहे. त्यामुळे माझ्या माय भूमीत सत्कार होत असताना इतकंच सांगेन माझी जबाबदारी आता वाढलेली आहे. असेच कायम प्रेम माझ्यावर आपले रहावे हीच अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले आज शशिकांत शिंदे तिकडे गेले असते तर ते मंत्री झाले असते. परंतु जे गेलेत ते जनतेचा विकास करायचा या गोंडस नावाखाली स्वतःचा विकास करायला गेलेत. सध्याच्या राजकारणाची जनतेला किळस वाटू लागली आहे. त्यामुळे निष्ठा ठेवून शशिकांत शिंदे हे एकाच ठिकाणी स्थिर राहिल्याने निष्ठेच खरं नाव ‘शशिकांत शिंदे’ हेच आहे.यावेळी आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या कामकाजावर चांगलेच ताशेरे ओढले.
यावेळी माजी आ.सदाशिव सपकाळ रूपाली भिसे, बापूराव पार्टे, राजेंद्र शेलार यांची भाषणे झाली.
दरम्यान जावळी तालुक्याच्या हद्दीवर मोरावळे येथून शशिकांत शिंदे यांना जागोजागी असंख्य स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. तर मेढा शहरात प्रवेश होताच त्यांच्यावर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करत तुतारीच्या निनादात त्यांची मेढा शहरातून कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
सभेतील ठळक मुद्दे
पवार साहेबांच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होणे सोप्पी गोष्ट नाही.
विधान परिषदेत विरोधकांना आम्ही अभ्यासपूर्ण प्रश्न मांडून त्यांच्या मनात चांगलीच धडकी भरवतो. त्यामुळे रमी खेळणारे मंत्री देखील भविष्यात कधी रमी खेळणार नाहीत.
बोंडारवाडी धरणाचा प्रश्न सुटत नसेल तर एक थेंब देखील पाणी खाली जाऊ दिले नसते.
संपूर्ण माथाडी या सरकारने खिळखिळी केली.
आजच्या सत्कार प्रसंगी उपस्थित जनसमुदाय यावरून माझ्यावर आजही जावळी व कोरेगावची जनता तितकंच प्रेम करीत आहे.



