सातारा नगरपालिकेचे नगररचनाकार मोरे यांच्यावर शिस्तभंग व निलंबन कारवाई करण्याची मागणी

सातारा नगरपालिकेचे नगररचनाकार मोरे यांच्यावर शिस्तभंग व निलंबन कारवाई करण्याची मागणी
सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांची निवेदनाद्वारे मागणी
सातारा /वास्तवनामा वृत्तसेवा
सातारा नगरपरिषद सातारा येथील नगर रचनाकार मोरे यांनी बेकायदेशीरपणे जिल्हाधिकारी यांनी रद्द केलेल्या रेखांकन आराखड्यास अंतिम मंजुरी व तांत्रिक शिफारस करून शासनाचे आदेशाचे उल्लंघन केले आहे.त्यामुळे त्यांचेवर शिस्तभंग व निलंबन कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात व आपल्या लेखी तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की मौजे गोडोली येथील स.न.२३/४/ब मध्ये मा. जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडील आदेश क्र. महा./जमीन /बिनशेती/१०३ /१५३ दि. १०/०८/१९८९ ने सर्व विभागांचे तांत्रिक अभिप्राय घेऊन जिल्हाधिकारी यांनी बिनशेती आदेश पारित केलेला होता. त्या बाबत अंतिम मंजुरी घेण्यात आलेली नव्हती. रेखांकनमधील काही तांत्रिक चुकीमुळे लेआउट मध्ये बदल करणेसाठी मुळ मालक यांनी पुन्हा दुरुस्ती ( रिवाईज ) अर्ज सादर केले वरून मा. सहा. संचालक नगररचना, सातारा यांनी रिवाईज रेखांकन आराखड्यास आदेश क्र. महा/तीन / जमीन/१०८७/७४९ सातारा दि.३१/०८/१९९४ मंजुरी दिलेली होती. यामध्ये पूर्वीचा आदेश दि. १०/०८/१९८९ चा दिलेला रद्द करीत आहे असे नमूद केलेले आहे.
यानंतर सदरची मालमत्ता नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीमध्ये आलेमुळे मंजुरीचे अधिकार त्यांना प्राप्त झाले. याचा गैर फायदा घेऊन मुळमालक यांनी सदरचा लेआउट म्हणजे दि. १०/०८/१९८९ चा जो आदेश रद्द केलेला आहे. तो सादर केलेवरून नगरपरिषद सातारा नगररचनाकार यांनी आर्थिक तडजोड करून मा. जिल्हाधिकारी सो यांनी रद्द केलेल्या रेखांकनास मंजुरी दिली. याबाबतीत त्यांना कल्पना दिलेली होती कि, सदरचा रेखांकन आराखडा रद्द केलेला आहे. परंतु त्यांनी कोणतीही सबब न ऐकता तो रेखांकन आराखडा मंजूर केलेला आहे.
यावरून सदरचे नगररचनाअधिकारी हे कायद्याला जुमानत नसलेचे दिसून येत आहे. त्यामूळे नगररचना अधिकारी मोरे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी व त्यांनी शासनाचा आदेश न मानणे,रेखांकन आराखड्यास मंजुरी देऊन शासनाची फसवणूक करणे, इतर प्रशासकीय कार्यालयास ( उपअधिक्षक भूमी अभिलेख सातारा , तहसीलदार सातारा, मंडलाधिकारी सातारा, तलाठी सातारा ) दिशाभूल करणारी कागदपत्रे आपले सहीने पाठविणे, आपले वरिष्ठांच्या सूचना न मानणे, चूक माहिती असताना विनाकारण समाजात तेढ निर्माण होईल अशी कृती करणे इ. बाबींचा ठपका ठेऊन त्यांचेवर शिस्तभंग व निलंबनाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी महारुद्र तिकुंडे माहिती अधिकार यांनी केली आहे.



