राजकीय

भाऊंनी जॅकेट चढवले आहे म्हणजे निवडणुकीची तयारी झालीय

मंत्री शिवेंद्रसिंहराजे ; सोमर्डीत सोसायटी इमारत उदघाटन,वाचनालय इमारत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा

 मानकुमरे भाऊ हे आपल्या सोबत असणाऱ्यांना बरोबर घेणारे तर आहेतच, मात्र विरोध करणाऱ्यांना देखील सोबत घेऊन काम करणारे कणखर नेतृत्व आहे. आज त्यांनी अंगावर जॅकेट चढवले आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांची निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी पूर्ण झाली आहे.  अशी मुश्किल टिप्पणी मानकुमरे भाऊंच्या जॅकेट वरून करीत नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक प्रकारे म्हसवे गटात वसंतराव मानकुमरे हेच उमेदवारी करतील यावर शिक्कामोर्तबच केले.

निमित्त होते सोमर्डी येथील सोमर्डी-शेते सोसायटी इमारत उद्घाटन,व नेताजी सुभाषचंद्र बोस सार्व. वाचनालय इमारत भूमिपूजन कार्यक्रमाचे. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड चेअरमन सौरभ शिंदे, उद्योजक दत्ता शेठ भालेघरे, जावळी बँक चेअरमन विक्रम भिलारे,व्हॉईस चेअरमन चंद्रकांत दळवी, माजी उपसभापती दत्ता शेठ गावडे, चंद्रकांत गावडे,हिंदुराव तरडे, रवींद्र परामणे, मालोजी शिंदे,जिल्हा बँक मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, मच्छिंद्र मुळीक,सागर धनावडे, जयदीप शिंदे, जयश्री मानकुमरे,मोनाली बारटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले संपूर्ण मतदारसंघात आपण विकासात्मक वाटचाल करीत असताना येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाची ताकद आपल्याला दाखवावी लागणार आहे. त्या दृष्टीने सर्वांनी एक संघपणे राहून निवडणूकीला सामोरे जाऊया.तालुक्याचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नशील राहीन.
यावेळी नेते वसंतराव मानकुमरे यांनी “शेर को डरा सकते है !धमका नही”शायरी मारत जोरदार फटकेबाजी केली.तालुका विकासाच्या पातळीवर पुढे आणण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कष्ट घेतले आहेत.मग इथले रस्ते,पर्यटन असो मूलभूत प्रश्न ते सोडवत आहेतच, त्याबरोबर प्रतापगड कारखान्यालाही त्यांनीच हातभार लावल्याने कारखाना व्यवस्थितरीत्या चालला आहे.

राजणेंना बँकेत मीच निवडून आणलं

यावेळी वसंतराव मानकुमरे म्हणाले मी ६१ वर्षांचा झालो असलो तरीही मी आता जॅकेट चढवले आहे. त्यामुळे म्हसवे गटात उमेदवार कोण हे तुम्ही समजून जावा. असे मिश्किलपणे म्हणत जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदें सारख्या बड्या नेत्याचा पराभव करून ज्ञानदेव रांजणे साहेबांना बँकेत मीच निवडून आणलं. याची आठवण त्यांनी करून देत. म्हसवे गटात आम्हाला काही अडचण नाही. मात्र जिल्हा परिषद कुडाळ गटात जयदीप शिंदे सह इतरांच्या ज्या गडबडी सुरू आहेत त्या गडबडी आता बंद करा,असे खडे बोल देखील त्यांनी कुडाळ गटातील गडबडींवर संबधितांना सुनावले.

यावेळी संदीप परामणे यांनी प्रास्ताविक करीत सार्वजनिक वाचनालयास बाबाराजेंनी आपल्या दूरदृष्टीने नूतन इमारत मंजूर करीत वाचनालयास आतापर्यंत जे जे सहकार्य केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. व आपण मानकुमरे भाऊंचा राजकीय मानसपुत्र म्हणूनच यापुढे तालुक्यात त्याच्या सोबत काम करीत राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी मानकुमरे यांचा मान्यवरांच्या व मानकुमरे सर्व कुटूंबियांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button