“संघशक्ती युगे युगे” नारा देत तानाजी आगुंडे जाणार संघात
रविवारी जवळपास ४० शिक्षकांसमवेत जल्लोषात शिक्षक संघात होणार प्रवेश

सातारा : वास्तवनामा वृत्तसेवा
जावळी तालुका शिक्षक समितीचे शिलेदार व कोयना विभागातील शिक्षक नेते तानाजी आगुंडे हे रविवारी “संघ शक्ती युगे युगेचा” नारा देत आपल्यासोबत जवळपास ४०शिक्षकांना सोबत घेऊन शिक्षक संघात प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.शिक्षक समितीचे माजी राज्यअध्यक्ष उदय शिंदे शिक्षक समितीतील होणारीं ही पडझड रोखण्यात सपशेल अपयशी ठरले असून,यामुळे समितीचे मोठे नुकसान होणार आहे. तर संघाची ताकद आणखी वाढण्यास मदत होणार आहे.
२०२२ मध्ये झालेल्या शिक्षक बँक निवडणुकीत शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष असताना देखील उदय शिंदे यांना आपल्याच जावळी तालुक्यात शिक्षक बँकेचा उमेदवार निवडून आणण्यात अपयश आले होते. यापूर्वी देखील अनेक निवडणुकीत शिक्षक समितीचा पराभव होत आलेला आहे. शिक्षक समितीतील झारीतील शुक्राचार्य ओळखण्यात नेतृत्व कमी पडत असल्याने समितीला बँक निवडणुकीत गेली दोन्ही टर्म यश मिळवता आले नाही.
पुढील राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तसेच शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने तानाजी आगूंडे यांनी समितीला रामराम करण्याचा निर्णय घेत, जावळी तालुक्यातील शिक्षक संघातील नेत्यांच्या नेतृत्वाखाली ते संघात प्रवेश करीत आहेत. आगुंडे यांच्यासोबत जवळपास ४० शिक्षक हे संघात प्रवेश करीत असल्यामुळे संघाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
रविवारी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत शिक्षक संघाचे तालुकास्तरीय अधिवेशन मेढा येथे आयोजित करण्यात आले आहे. या व्यासपीठावर आगुंडे यांच्यासह इतर शिक्षकांचा शिक्षक संघात प्रवेश होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.



